बीड : महान्यूज लाईव्ह
बीड जिल्ह्यातील धारूर नगरपरीषदेचे विद्यमान नगराध्यक्ष असलेल्या डॉक्टरने १९ वर्षीय तरुणीशी अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरूपसिंग हजारी याच्याविरोधात धारूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान हा गुन्हा खोटा असल्याचे सांगत डॉक्टर संघटना व समर्थकांनी आंदोलन छेडले आहे.
डॉ. हजारी सध्या धारूर नगरपरीषदेचा नगराध्यक्ष असून सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने १९ वर्षीय तरुणीला त्याने सोनोग्राफी सेंटरमध्ये बोलावले आणि तिच्यासमवेत अश्लील चाळे केले अशी तक्रार संबंधित तरुणीने पोलिसांकडे दिली. त्या घटनेने बीड जिल्ह्यात राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून दुसरीकडे डॉक्टरच्या समर्थनार्थ डॉक्टर संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. तर संबंधित डॉक्टरला तातडीने अटक करावी म्हणूनही काही संघटनांनी इशारा दिला आहे.
डॉ. हजारी सध्या फरार असून धारूर शहरात सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे. आज बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहेत. हजारी याच्याविरोधात पोलिसांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.