नाशिक : महान्यूज लाईव्ह
भाजपने गेल्या दीड वर्षापासून पध्दतशीरपणे महाविकास आघाडीतील मंत्री, आमदारांना लक्ष्य केले आहे. आता गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू केलेल्या अनिल परब यांच्यानंतर भाजपचा पुढील मोहरा मंत्री जितेंद्र आव्हाड आहेत. आज
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन यासंदर्भात मोठा गौफ्यस्फोट केला. इडीच्या यादीत आव्हाड हे १२ वे खेळाडू आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता सोमय्या बोललेत म्हटल्यावर ईडीची नोटीस आव्हाड यांना उद्या येते की, दोन दिवसांत? याकडे राजकीय क्षेत्रात नजरा वळल्या आहेत.
किरीट सोमय्या यांनी आज नाशिकचा दौरा केला. त्यांनी येथे अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या कंपनीची पाहणी करून मालमत्तेची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौफ्यस्फोट केला. लिस्टमधला 12वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं सांगत त्यावर अधिक माहिती देणे त्यांनी टाळले. मात्र त्यानंतर लगेचच राजकीय वर्तुळात ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार असल्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींवर ७० कोटींचा आरोप केला. ही रक्कम त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेकडून प्रतिष्ठानच्या संस्थेत रुपांतरीत केली व वर्ग केली असा आरोप केला. यासाठी बोगस कागदपत्रे वापरण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.
सोमय्या यांनी नाशिकमध्ये बोलताना अनिल परब यांच्याविरोधात आपणच पहिल्यांदा कारवाईची मागणी केली असे सांगितले. त्यानंतर मागील सरकारच्या वेळी ईडीची कारवाई योग्य असे म्हणणारे उध्दव ठाकरे आता मंत्रीमंडळातील भ्रष्ट सहकाऱ्यांना का पाठीशी घालत आहेत असा आरोप केला.
अनिल परब, अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना आमदार यामिनी जाधव, यशवंत जाधव, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याविरोधात आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहिती सोमय्या यांनी दिली.