मुंबई : महान्यूज लाईव्ह
घरातील गॅस सिलींडर गेली वर्षभर दिसामाजी तोळा या पध्दतीने महागत असून आज त्यामध्ये पुन्हा २५ रुपयांची वाढ झाली आहे. दररोज दर जाहीर करण्याच्या पेट्रोलियम कंपन्यांच्या नव्या नियमावलीमुळे या एकाच वर्षात चक्क २०० रुपयांनी घरातील गॅस महागला आहे. त्याची झळ आता स्वयंपाकघरात बसू लागली आहे.
आज नव्या दरवाढीमुळे १४.२ किलोचा मुंबईतील गॅस सिलींडर ८८४.५० रुपये एवढ्या किंमतीवर पोचला असून इंदापूर, बारामतीत हा गॅस सिलिंडर ९४० रुपयांना झाला आहे. थोडक्यात अच्छे दिनची जाहीरात अंगावर घेतल्यापासून गॅस सिलिंडर ५०० रुपयांनी वाढला आहे. २०१४ मध्ये हाच सिलिंडर ४४० रुपयांना पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मिळत होता.
६६ रुपये किलो गॅसची झाली किंमत
नव्या दरवाढीमुळेच नव्हे तर आता प्रतिकिलो गॅस ६६ रुपये किमतीवर पोचला आहे. सामान्यांचे जगणे हैराण करणारी ही गोष्ट असून एकतर अगोदरच सरकारने रॉकेल बाजारातून काढून घेतले आहे आणि लोकांना पूर्णतः गॅस सिलिंडरवर अवलंबून ठेवले आहे.