बारामती : महान्यूज लाईव्ह
अलिकडे देशाच्या पातळीवर पाहिले तरी, विकासाची सूज आली की, जोडीला भ्रष्टाचाराची किड सोबत येते.. नव्हे ते अगदी एकावर एक फ्री या ऑफरसारखेच असते. त्यामुळेच एखाद्या ठिकाणी विकासाची कामे दिसू लागली की, जोडीला नोकरशाहीचा उन्मादही दिसून येतो.. कोणतेच काम टक्केवारीशिवाय ना दिले जाते, ना त्यावर कार्यवाही केली जाते..!
बारामतीत नेत्यांनी अधिकाऱ्यांना जास्त कामे वेगात करता यावीत यासाठी दिलेल्या स्वातंत्र्याचा फटका कधीकधी चुकीच्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे सामान्यांना, विकासकांना बसतो.. अधिकाऱ्यांना स्वातंत्र्य दिले जाते, त्याचा गैरफायदा कधीकधी काही अधिकारी घेतात आणि खोऱ्याने पैसा उकळणे म्हणजे काय याचा प्रत्यय देतात.. काल बारामतीत बांधकामांशी संबंधित दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आणि चक्क काहींनी पेढे वाटले..!
बारामतीतील बांधकामाशी निगडीत दोन अधिकाऱ्यांच्या काल बदल्या झाल्या आणि त्यानंतर काही जणांनी अक्षरशः पेढे वाटले.. तीन वर्षांपासून म्हणे यांचा उन्माद आम्ही पाहिला. आता बारामती शहरासह इंदापूर, दौंड अशा तीन तालुक्यातील घर बांधू पाहणाऱ्यांची अशा उन्मादातून सुटका होईल या आनंदाने हे पेढे वाटण्यात आले.
वास्तविक पाहता हे पेढे काही जणांनीच वाटले. मात्र काही महिन्यांपूर्वीच कोरोनाच्या काळात बांधकाम व्यावसायिकांनी देखील एका अधिकाऱ्याच्या हाताला लकवा आला असल्याने बंडाचे हत्यार उपसले होते. मात्र याच्या नाराजीचा फटका खूपच बसेल हे लक्षात आल्याने प्रकरणाची जिरवाजिरवी केली होती.
बारामतीचा गेल्या पंचवीस वर्षांचा अनुभव असा की, या तालुक्यात नोकरशाहीला प्रचंड स्वांतत्र्य दिले जाते. इतर तालुक्यात जे सर्रासपणे दिसते, तसे येथे दिसत नाही. लोकप्रतिनिधी अथवा त्यांनी तालुक्यात सांगितलेल्या त्यांच्या नजिकच्या महत्वाच्या नेत्यांचा कार्यकर्त्याच्या चुकीच्या कामासाठी किंवा एखाद्या आडव्या कामासाठी अधिकाऱ्यांना फोन जात नाही. परिणामी अधिकारी निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र असतात.
यामागे हेतू असा असतो की, अधिकाऱ्यांना निर्धोक काम करता आले की, कामाचा वेग वाढू शकतो. वेळेत कामे होऊ शकतात. मात्र गेल्या काही काळातील अनुभव असा की, या स्वातंत्र्याचा गैरफायदा अधिकारीच घेऊ लागले आहेत. त्यातच अधिकारी चुकीचे वागतात हे लक्षात येऊनही कोणीच काही बोलत नाही.
याची झळ बसली तरी, आपल्या एखाद्या बंडखोरी वृत्तीमुळे आपल्याच नेत्याची अपप्रतिष्ठा होईल अशी भीती वाटल्याने या अधिकाऱ्याविरोधात कोणतेही कृत्य करण्यास किंवा अधिकाऱ्याची उघड उघड तक्रार करण्यास येथील कार्यकर्ते, व्यावसायिकही तयार नसतात. प्रचंड कष्ट घेऊन आपले लोकप्रतिनिधी अहोरात्र कष्टत असल्याने त्यांना कोठे विचारणा होईल, त्यांना खुलासा करावा लागेल असे कोणतेही कृत्य करण्यास कोणीच राजी होत नाही.
अर्थातच बारामतीत कोठे काही खुट्ट झाले की, ती राज्याची ब्रेकींग न्यूज बनते हा भाबडा आशावाद त्यामागे असतो आणि नेत्यावर प्रचंड प्रेम असल्याने अधिकाऱ्यांची फाजीलशाही लोक निमूटपणे सहन करतात. फारच थोड्या वेळा अशा अधिकाऱ्यांचे अति झाल्यानंतर नेत्यांच्या कानावर गोष्टी घातल्या जातात. काही न बोलता अशा अधिकाऱ्यांची थोड्या दिवसांत गच्छंती होते. मात्र हे फारच थोड्या वेळा घडते.
त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांना पुढील कामाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी जायला हवे, तिथे बदल्या झाल्यानंतर लोक पेढे वाटत असतील, तर अधिकाऱ्यांनीही याचा बोध घ्यायला हवा, एवढीच माफक अपेक्षा बारामतीकरांची असावी. त्याला थोडा फाटा काल दिला गेला आणि चक्क पेढे वाटले गेले. आता पेढे वाटले गेलेत, म्हटल्यावर किती उन्माद झाला असेल याचा विचार पेढ्याएवढ्याच गोडीने करायला पाहिजे नाही का?…!