आळंदी : महान्यूज लाईव्ह
आळंदी नगरपरिषद उपनगराध्यक्षा श्रीमती पारुबाई तापकीर यांनी उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी दिली.
या प्रसंगी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, भाजपाचे सभागृहनेते पांडुरंग वहिले, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष नगरसेवक सागर भोसले, प्रशांत कु-हाडे, सचिन गिलबिले, शिवसेनेचे नगरसेवक माजी गटनेते तुषार घुंडरे, सामाजिक कार्यकर्ते गणेश राहणे, सूरज रंधवे आदि उपस्थित होते.
१७ ऑगस्ट २०२१ रोजी श्रीमती पारुबाई तापकिर यांची नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाली होती. पक्षादेशाने इतर सदस्यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांचे समवेत झालेल्या चर्चेनुसार पुन्हा उपनगराध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचे गटनेते पांडुरंग वहिले यांनी सांगितले. आळंदीत भाजपची एकहाती सत्ता असून भाजप कडे नगराध्यक्षांसह ११ नगरसेवक असून १ अपक्ष सदस्याने भाजपात जाहीर प्रवेश केल्याने भाजपकडे १२ सदस्य संख्या आहे.
शिवसेनेकडे ६ आणि १ अपक्ष असे पक्षीय बलबल आहे. आळंदीत १९ सदस्य निवडून आलेले सभागृहात आहेत. याशिवाय २ स्वीकृत सदस्य असून एक जागा रिक्त आहे. रिक्त जागेवरील नियुक्ती साठी जाहीर केलेली विशेष सर्वसाधारण सभा तहकूब झाल्याने अद्याप एक स्वीकृत सदस्य जागा रिक्त आहे.
या जागेवर वर्णी लागावी यासाठी भाजपकडे इछुकांची संख्या मोठी आहे. निष्ठावान कार्यकर्ते यांना या पदावर काम करण्याची संधी मिळावी अशी मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष बंडुनाना काळे यांनी केली आहे. येत्या आठ दिवसांत आळंदीत उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी विशेष सभा होण्याची शक्यता आहे.