नगर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे बोलून नाही, तर अगोदर करून दाखवतात. आताही ते चर्चेत आले, कारण कर्जत या भाजपच्या अभेद्य बालेकिल्ल्याला आता चांगलाच सुरूंग लागला असून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्जत नगरपरीषदेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधले…!
कर्जतच्या नगरपरीषदेच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश आज हडपसर येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत झाला. कर्जतमधील भाजपचे नगरसेवक नितीन तोरडमल, लालासाहेब शेळके, भाजपचे नेते प्रसाद ढोकरीकर, देविदास खऱात आदींनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादीचे कर्जत शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक अध्यक्ष विशाल म्हेत्रे, स्वप्नील तनपुरे, संतोष नलावडे आदींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. विशेष म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कालच माजी मंत्री राम शिंदे यांच्यासमवेत कर्जतचा दौरा केला होता. त्यांनी येथून जाताच दुसऱ्याच दिवशी या नगरसेवकांनी हातात घड्याळ बांधले.











