मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी इंद्रेश्वर मंदिरात भाजपा ओबीसी मोर्चाकडून घंटानाद आंदोलन
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
विविध प्रकारची उद्घाटने तसेच अनेक कार्यक्रम राज्यभरात चालू आहेत, शासनाची सर्व कामेही चालूच आहेत,मात्र कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत राज्यातील मंदीरे बंद ठेवली आहेत, शासनाने मंदिरात जाण्यासाठी घातलेल्या बंदीमुळे शासनाचा निषेध करत सर्व मंदीरे त्वरित खुली करावी, तशी शासनाने परवानगी द्यावी, या मागणीसाठी आज सोमवारी इंदापूर शहरातील इंद्रेश्वर मंदिरात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने कोरोना संसर्गाचे कारण पुढे करून सर्व मंदिरे बंद केली. सद्यस्थितीला शासनाचे सर्व कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, विविध कामांची उद्घाटने चालू आहेत. पंढरपूरची पोटनिवडणूक देखील कोरोना असताना झाली.
मात्र हिंदू धर्मातील श्रद्धेचा महिना असणारा श्रावण महिना चालू असताना देखील सर्व भाविक भक्तांना मंदिरात जाऊन महादेवाची पूजा अर्चा करता येत नाही. श्रद्धास्थान असणाऱ्या महादेवाच्या मंदिरामध्ये शासनाने येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आम्ही शासनाचा निषेध व्यक्त करतो.
शासनाने पुढील आठ दिवसात मंदिरे खुली केली करण्याची परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला. यावेळी प्रेमकुमार जगताप, सचिन कदम, लक्ष्मण कोलते, रवी सुतार, अशोक व्यवहारे, बाळू भिसे, सुरेश सुतार, ओंकार हिंगमीरे, भागवत राऊत, संतोष सुतार इत्यादी उपस्थित होते.