दौंड : महान्यूज लाईव्ह
यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी मागील तीन दिवसांपासून पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम राबवली आहे. रविवारी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डूबेवाडी परिसरात तीन ठिकाणी वेगवेगळ्या हातभट्टी अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी 17 हजार लिटर रसायन तसेच तीन लाख सहा हजार किंमतीचे दारू तयार करण्याचे साहित्य जागीच नष्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे , पोलीस हवालदार चांदणे,दौंडकर, मेघराज जगताप आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.