माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २९ – गेल्या काही महिन्यापासून रात्रीचा फायदा घेऊन पुणे – सातारा महामार्गावर उभ्या असणाऱ्या वाहनांच्या डिझेल च्या टाकीतून डिझेल चोरीचे सत्र सुरू होते. राजगड पोलिसांनी रात्रगस्त घालून यातील सराईत चोरट्यांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून अटक केली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईचे कौतुक होत आहे.
संतोष विठ्ठल पारस्कर वय ३८ कोपरखैरणे, नवी मुंबई, आयुब शहा २४ रा. चेंबूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून गजानन विठ्ठल खंदारे (रा. कोपरखैरणे) हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे.
पुणे सातारा महामार्गावरील अडबलनाथ मंदिरालगत आज रविवारी (दि. २९) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली आहे. चोरट्यांच्या गाडीमध्ये ३५ लिटरचे आठ मोकळे प्लास्टिकचे कॅन, दोन पाईप मिळून आले. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
मिळविलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम, सहाय्यक उपनिरीक्षक कदम, पोलीस नाईक गणेश लडकत कदम, कॉन्स्टेबल सोमनाथ जाधव हे रात्रगस्त घालत असताना पुणे-सातारा महामार्गावरील अडबालनाथ मंदिराच्या शेजारी सर्विस रस्त्यावरच्या रोडच्या कडेला स्विफ्ट कार एम.एच.१० ए.डब्ल्यू ६४१३ ही संशयास्पदरित्या उभी असल्याचे दिसून आली.
यावेळी पोलिसांनी कारच्या जवळ जाताच चोरटे गाडी सोडून मोकळ्या रानात पळत सुटले. यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून तिघांपैकी दोघांना पकडले पकडले, तर एक जण फरार झाला आहे.
चोरट्यांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देताच पोलिसी खाक्या दाखवला. मग मात्र चोरट्यांनी राजगड सहकारी कारखानाच्या शेजारील एका ढाब्याच्या समोर उभ्या असलेल्या कंटेनर वाहनातून १५० लिटर डिझेल चोरल्याची कबुली दिली. पुढील तपास राजगड पोलीस करत आहे.