राज्यात होणार २३ लाख लसीकरण; पुणे जिल्ह्यात दीड लाख लसीच्या डोसचा लाभ..!
राजेंद्र झेंडे : महान्यूज लाईव्ह
३१ ऑगस्ट हा दिवस पुणे जिल्ह्यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधक उपाययोजनेतील महत्वाचा दिवस असणार आहे. या दिवशी बजाज समूहाने लोकांप्रती उत्तरादायित्वाचा भाग म्हणून दिलेल्या दीड लाख लसी एकाच दिवशी जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये आतापासूनच जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण राज्यात बजाज ने २३ लाख लसींचे डोस देऊ केले आहेत. त्यापैकी दीड लाख लसींचे डोस पुणे जिल्ह्यासाठी मिळाले आहेत.
बजाज समूहाने संपूर्ण राज्यात कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी अर्थात सीएसआर अंतर्गत २३ लाख लसींचे डोस विकत घेऊन राज्याकरीता दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लसींच्या तुटवड्याची चिंता अंशतः का होईना मिटणार आहे. यापैकी पुणे जिल्ह्यासाठी १ लाख ५० हजार कोरोनाच्या लसींचे डोस व १ लाख ६५ हजार सिरींज दिल्या आहेत.
त्यांची मोहिम ३१ ऑगस्ट या एकाच दिवशी संपूर्ण राज्यात राबवली जाणार आहे. त्याकरीता सर्व गावांमधील लस देण्यापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यापासून ते राजकीय, सामाजिक पदाधिकाऱ्यांना समवेत घेऊन हे लसीकरण होणार आहे.
त्यासाठी जिल्ह्यांजिल्ह्यांतील आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या आहेत. पुणे जिल्ह्यातही आतापर्यंत तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला मिळालेल्या एकाच दिवसाच्या कमाल लसींच्या डोसच्या किमान तिप्पट डोस एका दिवसासाठी मिळणार असल्याने काहीसा ताणही आरोग्य यंत्रणेवर येणार आहे. बजाजने दिलेल्या लसींच्या डोस व्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकार देत असलेल्या लसींचे डोसही मिळणारच आहेत. त्यामुळेच ही संख्या कमाल पातळीवर जाऊन राज्यात हा दिवस विक्रमी लसीकरणाचा बनू शकतो.











