बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीत काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच बॅटिंग केली. मॅग्नेट प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात बोलता बोलता अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेची माहिती सांगितली. कोरोनाची तिसरी लाट अधिक गंभीर असल्याचे सांगत मास्क वापरा आणि आपल्या कुटुंबासह इतरांचीही काळजी घ्या असे आवाहन केले. या दरम्यान त्यांना अचानक त्यांच्यासमोर एक वृत्तवाहिनीचा कॅमेरामन विनामास्क शूटिंग करत असल्याचे दिसले आणि त्यावरून अजित पवार यांनी त्याची चांगलीच शाळा घेतली.
अजित पवारांनी त्याला, ‘हा बघा शहाणा; मास्क न घालताच आलाय! शूटिंग करतोय आणि मास्क नाही; सांगू का तुला पोलिसांना उचलायला? पुन्हा लोक म्हणतात दादा लय कडक आहे म्हणून!’ असे म्हटले आणि कॅमेरामनने लगेच मास्क चढवला. ही घटना घडल्यानंतर मात्र दिवसभर अजित पवारांच्या दौर्यात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले पोलीस सुद्धा सर्वांना मास्क घाला रे बाबांनो, अन्यथा दादा खूप बोलतात असे सांगू लागले.
सुपेमध्ये देखील अशीच घटना घडली. वढाणे येथे रसिकलाल धारीवाल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आलेल्या जनाई उजव्या कालव्यातून वढाणे तलावात पाणी सोडण्याच्या कार्यक्रमात सुप्यातील एका स्थानिक नागरिकाने एक तक्रार केली. तेव्हा अजित पवार यांनी तू मास्क का घातला नाही? असा प्रश्न विचारला.
त्यावर, ‘दादा, मला तुमच्याशी बोलायचे होते, म्हणून मास्क घातला नाही, माझा मास्क आहे, असे म्हणताच दादांनी आवाज चढवला आणि म्हणाले, ‘मी बोलत नाही का? मी मास घातलेला आहे का नाही? माझा आवाज पोचतोय ना? मग तुझा माझ्यापर्यंत कसा पोहोचणार नाही? असे सांगत, गमतीचा भाग जाऊ दे, तुझं काम करतो, पण मास्क सगळ्यांनी घाला’ अशी पुन्हा एकदा अजित पवार यांनी सूचना केली.