रत्नागिरी : महान्यूज लाईव्ह
पुन्हा सुरू केलेल्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान कणकवली येथे नारायण राणे यांना शॉक बसला. हा शॉक राजकीय नसून विद्युत पुरवठ्याचा होता, मात्र त्यांच्या शेजारीच उभे असलेले प्रवीण दरेकर लगेच सावध झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जून आशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे कणकवली येथे आले होते. त्यावेळी पाऊस सुरू होता. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी होती. मात्र सभा सुरू होण्यापूर्वी कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा होता. तेथे विद्युत रोषणाई करण्यात आली होती आणि या विद्युतरोषणाईला वीजपुरवठा करणाऱ्या वायर मध्ये बिघाड झाला होता.
राणे तिथे पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांना काही तरी सांगत होते, मात्र राणे यांनी अगोदर मी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतो असे सांगत तिकडे निघाले आणि तेथील लोखंडी फ्रेम ला हात लावला. तर त्यांना शॉक बसला. त्यानंतर त्यांनी लगेच कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचवेळी त्यांच्या लगेच पाठीमागे असलेले प्रवीण दरेकर बेमालूमपणे सावध झाले.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर राणे यांनी लगेचच इतरांनाही सावध केले आणि तातडीने दुरुस्ती करून घ्या अशी सूचना केली. त्यानंतर राणे यांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.











