रमेश टाकळकर यांचे मत
किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
इंदापूरचे नवनियुक्त तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक विधायक व नागरिकांना, शेतकऱ्यांना दिलासा देणारी कामे करण्याचा सपाटा लावला आहे. तहसीलदारांनी गाव भेट दिल्यानंतर गावातील समस्या गावातच सुटतील त्यामुळे त्यांनी तालुक्यात राबवलेला ‘ गावभेट ‘ हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत महाराष्ट्र राज्य महसूल समितीचे अध्यक्ष रमेश टाकळकर यांनी व्यक्त केले.
टाकळकर हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी इंदापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बोलताना टाकळकर म्हणाले की, शेतकऱ्यांना दिला जाणारा सातबारा, आठ अ तसेच प्रमाणित नकला देणेकामी नागरिकांकडून सातबारा साठी 15 रुपये प्रति पान याप्रमाणे शुल्क आकारण्यात येते.
मात्र सातबारावर पाच रुपये प्रिंटचा उल्लेख असतो. आकारलेल्या शुल्काची पक्की पावती मिळत नाही. याबाबतची तक्रार टाकळकर यांनी विभागीय आयुक्तांना केली होती. त्यावर विभागीय आयुक्तांनी पक्की पावती देण्याचे आदेश दिले आहेत.
त्या आदेशाची अंमलबजावणी इंदापूर तालुक्यातून व्हावी तसेच संगणकीय सातबारा च्या खालील बाजूस पाच रुपये प्रिंट असे लिहिलेले असते. त्याची पक्की पावती मिळत नसल्याने ही रक्कम शासनाच्या ट्रेझरीत जमा होत नाही. त्यामुळे एक प्रकारे शासनाचे नुकसान होत आहे. असे सांगितले.
यावेळी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड तुषार झेंडे पाटील, जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य देवेंद्र सासवडे, इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे, उपाध्यक्ष महेश पाटील, प्रवासी प्रमुख वैभव निंबाळकर, शहराध्यक्ष अनिल पवार, बँक व सायबर समितीचे अध्यक्ष भारत विठ्ठलदास, ऊर्जा समिती प्रमुख तानाजी खैरे, तालुका सचिव मधुकर शेंडे, आरोग्य समितीचे अध्यक्ष शत्रुघ्न घाडगे, अॅड प्रवीण बारावकर, गणेश शेंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.