इंदापूर : महान्यूज लाईव्ह
सातपुतेवस्ती (बावडा) येथे लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे चार शेतक-यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. आग लागताच या परिसरातील शेतकऱ्यांनी प्रयत्न करून आग विझवली. त्यामुळे अधिकचे होणारे नुकसान टळले.
या घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी सदर ठिकाणी तात्काळ भेट देत नुकसानाची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या.
शंकर बाबु शिंदे, श्रीमंत भिकाजी जाधव, शितल मधुकर शिंदे व पांडुरंग माणिक साळुंखे अशी ऊस पीक जळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
अंकिता पाटील यांनी ऊस क्षेत्राच्या भेटी प्रसंगी महावितरण अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करून वीज तारांची व खांबांची दुरुस्ती करण्याची सूचना केली.
दरम्यान तलाठी व वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही पाहणी केली. या आगीत ऊस पिकातील ठिबक संचाचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यावेळी भविष्यात अशा घटना घडणार नाहीत व नुकसान होणार नाही, याबाबत त्यांना विद्युत तारा व इतर पोल दुरुस्ती करण्यासंदर्भात वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.











