किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
तुम्हाला प्रश्न पडला असेल ती गायब होते.. म्हणजे नक्कीच काहीतरी भुताटकीचा प्रकार असेल किंवा अंधश्रद्धेचा प्रकार असेल; मात्र गायब होणारी ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या मुलांच्या हातातील जिओ, आयडिया, एअरटेल कंपनीच्या मोबाईलची रेंज आहे.
शासनाने कोरोनाच्या काळात शाळा बंद, शिक्षण सुरू हा उपक्रम राबवला. शिक्षण सुरू.. याचा अर्थ ऑनलाईन शिक्षण ऑनलाइन! शिक्षण म्हटलं की, अँड्रॉइड मोबाइल आले आणि अँड्रॉइड मोबाईल म्हटलं की, सध्या सगळ्यांचा ओढा ज्या नेटवर्ककडे आहे ते म्हणजे जिओ, एअरटेल, आयडिया चे सिमकार्ड.!
मात्र सणसर तालुका इंदापूर परिसरातील जिओचे सिमकार्डधारक विशेषतः शाळकरी मुले जिओच्या ऑनलाइन शिक्षणा दरम्यान जाणाऱ्या रेंजमुळे अस्वस्थ आहेत.
ही झाली सकाळी साडे नऊ ते अकरा पर्यंत गोष्ट..! मात्र आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव येत असेल की, मोबाईल मध्ये टॉवर दाखवणाऱ्या कांड्या तर फूल आहेत, मात्र फोन येतही नाही आणि जातही नाही.
मग बऱ्याच जणांना आपला मोबाईल स्वीच ऑफ करून पुन्हा सुरू केला की दोन मिनिटात रेंज येते कसा अनुभव आहे. अनेक ग्राहकांच्या म्हणण्यानुसार कॉल ड्रॉप चे प्रमाणही सध्या वाढले आहे. आपण एखाद्या व्यक्तीला फोन लावला भलेही ती व्यक्ती तुमच्या जवळ तुम्ही ज्या टॉवरची रेंज वापरत असेल, त्या टॉवरच्या रेंजमध्ये अगदी तुमच्या मांडीला मांडी लावून बसली असेल, तरीही त्या व्यक्तीला तुमचा फोन लागणार नाही किंवा लागलाच तर फक्त एकाच बाजूचे संभाषण समोरच्याला ऐकू जाते. असे प्रकार वारंवार घडत आहेत.
अनेक पालकांनी जिओ कंपनीच्या कॉल सेंटर कडे तक्रारीही केल्या, परंतु ग्राहकाला दाद देतील तर ही कंपनी कसली? त्यामुळे अनेक शाळकरी मुलांचे पालक देखील वैतागले आहेत. एक तर अनेक पालकांकडे एकच मोबाईल फोन आहे आणि दोन मुले आहेत आणि काहींची तर अशी अवस्था होते की दोन्ही मुलांच्या ऑनलाइन शिकवण्याची वेळ एकच आहे.
मग प्रत्येकाच्या एैपती प्रमाणे पाच हजारापासून ते 15 हजार रुपयांपर्यंत खर्च करून नवीन मोबाईल आणि सिम कार्ड खरेदी केली जाते. त्यातही सध्या जिओचा बऱ्यापैकी ट्रेंड असल्यामुळे ग्राहक जिओचे सीमकार्ड खरेदी करण्याकडे आकृष्ट होतात. मात्र त्यांना आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे.
असाच प्रकार काहीसा आयडिया, एअरटेल सिम कार्डच्या बाबतीतही पालकांना येत आहे आयडिया चीही रेंज ठराविक ठिकाणीच येत असते. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांमुळे पालक तसेच ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शरद कांबळे, त्रस्त पालक, सणसर (ता. इंदापूर) : आम्ही आमच्या मुलांसाठी नवीन मोबाईल खरेदी केला आहे. आमच्या प्रपंचातून बचत करून आम्ही महागडा अँड्रॉइड नवीन मोबाईल घेतला आहे. मात्र मागील महिन्यापासून जिओची रेंज येत नसल्याने माझ्यासह अनेक पालक या प्रकाराने त्रस्त आहेत.
तीनशे रुपयांपासून पाचशे रुपये पर्यंत बॅलन्स टाकायचा आणि रेंज गेल्यामुळे त्याचा पुरेपूर वापरही आम्हाला करता येत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या वेळीच रेंज येत नसल्याने मुलांच्या शाळेचे नुकसान होत आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव जिओचे सिम कार्ड फेकून द्यावे लागेल.











