विशाल कदम: महान्यूज लाइव्ह
पिंपरी-चिंचवड – या राज्यात नेमके काय चाललेय असा प्रश्न पडावा इतपत गुन्हेगारी वर्तुळात पोलिसांचाच शिरकाव झाला आहे. पुण्यातील मुंढवा येथील कार्निवल पबमध्ये रजेवर असलेल्या फौजदाराने गणवेशात जाऊन हप्तावसुली केली. या प्रकारामुळे चिडलेल्या आयुक्त कृष्णप्रकाश यांनी त्याच्यावर थेट कठोर कारवाई केली असून त्याला निलंबित केले आहे.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसुली प्रकरणामुळे चांगलेच गोत्यात आले आहेत. अजूनही देशमुख यांच्यावर टांगती तलवार आहे. अनिल देशमुख यांचे ताजे उदाहरण असताना एका पोलीस उप निरीक्षकाला देखील त्याच्या पदाला गमवावे लागलेले आहे.
पुण्यातील मुंढवा येथील कार्निवल पबमध्येही घटना घडली आहे. मिलन कुरकुटे असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे. दरम्यान, पुण्यात एका पोलीस उप निरीक्षकाने सुट्टीवर असताना देखील वर्दी घालून पब मालकाकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला.
त्याच्या या वसुलीमुळे त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वातील पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या काळ्या कृत्यांनी खात्याची प्रतिमा मलिन केल्याची ही 15 पंधरा दिवसातली दुसरी घटना आहे. त्यामुळे या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबित केलं आहे. मिलन कुरकुटेने वैद्यकीय रजा घेतलेली होती. वर्दी घातलेल्या मिलन यांनी एका कार्निवल पबमध्ये जाऊन मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घालत पैशाची मागणी केली. या प्रकरणी पबच्या मालकांनी तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुरकुटेला तत्काळ निलंबित केलं. कुरकुटे हा मागील वर्षी एका प्रकरणात लाच घेतांना रंगेहाथ पकडला गेला होता आणि त्यावेळीही त्याला निलंबित करण्यात आलं होतं.