सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्थेमार्फत जेजुरी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होळकर वाड्याचे बांधकामासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून भरणे कुटुंबीयांच्या वतीने २,२२,२२२ रूपयांचा धनादेश संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री भरणे यांचे जाहीर आभार मानले आहेत. अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्थेमार्फत ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे या उदात्त हेतूने जेजुरी येथील प्रसिद्ध ऐतिहासिक होळकर वाड्याचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
त्या अनुषंगाने काल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची पुणे येथे भेट घेऊन सदर बांधकामासंदर्भात सविस्तर चर्चा केली असता, सदर कार्यात भरणे कुटुंबीयांचा खारीचा वाटा असावा म्हणून भरणे यांनी भरणे कुटुंबीयांच्या वतीने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे २,२२,२२२ रूपयांचा धनादेश सुपुर्द केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री भरणे यांनी आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासाचे जतन करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगून यापुढील काळातही आपल्या या लोकसहभागातून चाललेल्या कार्यात नेहमीच माझ्यासारखा कार्यकर्ता नेहमीच आपल्या बरोबरीने या कार्यात रहाणार असल्याची उपस्थितांना ग्वाही दिली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव भांड, उपाध्यक्ष श्री नागेशजी तिनर, सचिव सुनिल शेंडगे, कार्याध्यक्ष सोमनाथ नजन, संचालक मधुकर लंभाते, किरण दुगे, किसनराव पोटे, अनिल भांड, रमेश नाचण, चंद्रकांत मोरे, सुरेश भांड, महेश बारगळ, ज्ञानदेव भगत, दत्ताजी पिसे, संस्था मार्गदर्शक गणेश पुजारी, बाळकृष्ण गवते,जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, कै.अनंतराव पवार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घोगरे, बोरीचे माजी सरपंच ज्ञानेश्वर जोरी उपस्थित होते.