शिरूर : महान्यूज लाईव्ह
वडगाव रासाई (ता. शिरुर) येथील साखराई मळा येथे रक्षाबंधनासाठी माहेरी आलेल्या महिलेवर पुन्हा सासरी जात असताना वाटेतच बिबट्याने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तात्काळ पिंजरा बसवला आहे.
रक्षाबंधन निमित्ताने भाऊरायाला राखी बांधण्यासाठी मांडवगण फराटा येथील राणी युवराज घाडगे (वय- ४२ वर्षे) या आपल्या माहेरी वडगाव रासाई येथे आल्या होत्या. रक्षाबंधन कार्यक्रम उरकुन त्या मुलासमवेत सासरी घरी जाण्यासाठी रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास निघाल्या होत्या.
यावेळी बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप घालुन राणी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यात त्यांच्या हाताला बिबट्याचे दात तर कमरेला पंजाची नखे लागून त्या जखमी झाल्या आहेत. मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
याबाबत मुलगा अजित घाडगे यांनी सांगितले , दुचाकीचा वेग कमी होता. दोन्ही बाजूला ऊस होता. मात्र काही कळायच्या आत बिबट्याने दुचाकीच्या दिशेने झडप घातली. यावेळी आई रस्त्यावर पडलेली असताना आईच्या साडीला बिबट्या ओढत होता. यावेळी जोराने आरडाओरड केली.
जवळपास वस्ती नसल्याने कोणीही मदतीला येऊ शकले नाही. गाडीचा आवाज जोराने केल्याने अखेर काहीवेळाने कशीबशी सुटका केली. यानंतर बिबट्या निघून गेला, अशाही अवस्थेत मोठ्या धाडसाने तिथून निघून आलो अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली.
दरम्यान गावचे सरपंच सचिन शेलार यांनी पिंजरा बसवण्याची मागणी केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर, वनपरिमंडळ अधिकारी पी. ए. क्षीरसागर, वनरक्षक एस. जे. पावणे, एस. एम. जराड,वनसेवक एन. बी. गांधले, एस. बी. शितोळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.