माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
पुणे-सातारा महामार्गावर आज पुण्यातील कात्रज बोगद्याच्या बाहेर आल्यानंतर शिंदेवाडी च्या हद्दीत एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनीबसने अचानक पेट घेतला व त्या गाडीने पेट घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली. या गाडीमध्ये 15 प्रवासी होते. एक थरारक अनुभव घेत हे प्रवासी सुदैवानं आश्चर्यकारकरीत्या बचावले मात्र या आगीत बस जळून खाक झाली.
पुणे-सातारा महामार्गावर आज संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास पुण्याकडून साताराकडे टेम्पो ट्रॅव्हलर बस जात होती. या बसमध्ये 15 प्रवासी होते. कात्रज बोगद्यातून बस पुढे आल्यानंतर अचानक इंजिनमध्ये बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले आणि गाडीने पेट घेतला. अचानक गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात आले आणि चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली.
चालकाने गाडी बाजूला घेताच घाबरलेले प्रवासी तातडीने गाडी बाहेर पडले. त्याच ठिकाणी असलेले वेल्हे तालुक्यातील भाऊ दसवडकर व बाळासाहेब माने या दोघांनी प्रवाशांना दिलासा दिला व चालकास शांत केले. चालक खूप घाबरलेला होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘माझे मरण पाहिले म्या डोळा’ अशी भावना या भेदरलेल्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर होती आणि आपण एका अतिशय मोठ्या दुर्घटनेतून आश्चर्यकारकरीत्या बचावली याचे काहीसे समाधान देखील प्रवाशांकडे होते. मात्र प्रवाशांचे काही जणांचे सामानही बसमध्ये राहिले होते. ते मात्र आगीत जळून खाक झाले. दरम्यान या ठिकाणी अग्निशमन दलाची वाहने आली आणि त्यांनी आग विझविण्यास सुरुवात केली..