शिरूर : महान्युज लाईव्ह
पुणे ग्रामीण पोलिस दलात “देवमाणूस” म्हणून परिचित असलेल्या पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना निरोप देताना प्रत्येकजण भावूक होत असल्याचे चित्र आज पहावयाला मिळाले.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी असलेली शाखा म्हणजे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग.!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या बदलीनंतर सातारा येथून पद्माकर घनवट यांची पुणे ग्रामीण ला बदली झाली होती. या ठिकाणी १८ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी यांच्या खांदयावर होती.
मात्र घनवट यांनी अगदी अल्पावधीतच जिल्ह्यात दबदबा निर्माण केला. अनेक गुंडांना सळो की पळो केले. जुने गुन्हे उघडकीस आणले. त्याचबरोबर कार्ला येथील देवीचा कळस असेल की, कापूरहोळ येथील पोलिसांच्या वेशात घातलेला दरोडा हे दरोडे उघडकीस आणले च परंतु नामचीन गुंडांना अटक देखील केली.
पुणे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखताना खून, दरोडे, जबरी चोरी, मारामारी, आदी गंभीर स्वरूपाचे बहुतांश गुन्हे उघडकीस आणले आहेत. पुणे जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांपेक्षा स्थानिक गुन्हे शाखेची यामुळेच कारकीर्द अधिक सरस ठरली आहे.
पुणे जिल्ह्यात अलीकडील काळात “घोडा” संस्कृती उदयास येत असतानाच पद्माकर घनवट यांनी स्वतः पुढे येऊन सर्वाधिक अवैध पिस्तूल, रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या आरोपींना ताब्यात घेत जिल्ह्यात चांगलीच जरब बसवली.
स्थानिक गुन्हे शाखेचे कामकाज पाहताना अनेक गंभीर गुन्ह्यातील तपासाला ते स्वतः पुढे येऊन प्राधान्य देत असल्याने सोबत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांनाही काम करताना वेगळी ऊर्जा मिळत होती. खेळाचे मैदान असो, की ट्रेकिंग यातही ते सर्वांना सोबत घेऊन प्रोत्साहन देत असल्याने अंमलदार यांनाही आपुलकी निर्माण होत होती.
पुणे ग्रामीण गुन्हे शाखेतून त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाल्याने प्रत्येकजण येऊन त्यांना भेटत होता. यावेळी अनेकांना अश्रू अनावर होत असल्याचे चित्र आज पहावयास मिळाले.