माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २३ _ गेली ४२ वर्षे नसरापूर परिसरात वैद्यकीय सेवा बजावून विधायक कार्य करणारे डॉ. श्याम दलाल यांच्या हरजीवन हॉस्पिटलमध्ये अल्प दरात डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यामुळे भोर आणि वेल्हा या दोन तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या नसरापूर परिसरातील रुग्णांना याचा लाभ होणार आहे.
हरजीवन हॉस्पिटल नसरापूर ( ता. भोर ) येथे अत्याधुनिक लॅबोरेटरी व डिजीटल एस्क रे युनिटचे उद्दघाटन ज्येष्ठ डॉ. गणेश जोशी व उषा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विनय जोगळेकर, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, डॉ. श्याम दलाल, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. शिवाजी चव्हाण डॉ. पुष्कर दलाल, डॉ. पांडुरंग शिंदे, प्रभाकर पुरंदरे, डॉ. काळे, स्मिता दलाल, बनेश्र्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष हनुमंत कदम, नंदु राजे, आदी उपस्थित होते.
डॉ. विनय जोगळेकर याप्रसंगी म्हणाले की, बदलत्या काळानुसार वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानचा वापर करणे गरजेचे आहे. यामुळे रुग्णांवर वेळीच उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तर वाई अर्बन बँकेच्या माध्यमातून विविध कर्ज योजना मोहीम हाती घेतली असून व्यवसायिकांना याचा फायदा होत असून लवकरच भोर शहरात सुद्धा बँकेची शाखा काढणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे यांनी दिली.
यावेळी हरजीवन हॉस्पिटलमध्ये तब्बल ४२ वर्ष डॉक्टर बरोबर काम करणारे सहायक महेंद्र गायकवाड यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. श्याम दलाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक पवार तर डॉ. शिवाजी चव्हाण यांनी आभार मानले.