पुणे महान्यूज लाईव्ह
ऐन दिवाळीत राज्यात सहकारी संस्थांच्या निवडणूकींचा हंगाम सुरू होणार आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या काळात स्थगित केलेल्या निवडणूकांना पुन्हा हिरवा कंदील दाखवला असून येत्या २७ सप्टेंबर पासून निवडणूकांना सुरवात होणार आहे. पुण्यासह राज्यातील १५ बॅंकांच्या निवडणूका होणार आहेत. अर्थात जिथे बॅंकांनी रिक्त जागा भरण्यासाठी भऱती प्रक्रिया राबवली आहे, आता तिथे भरती होणार की, लांबणीवर पडणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहील्या आहेत.
जिल्हा बॅंकांच्या निवडणूका जिथे स्थगित केल्या होत्या, तेथपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातही बॅंकांची अंतिम मतदार यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यामुळे ३१ ऑगस्ट पर्यंत स्थगित केलेल्या जिल्हा बॅंकांच्या निवडणूका आता सुरू होणार आहे,
या निवडणूकांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, धुळे नंदूरबार, नाशिक, लातूर, जळगाव या जिल्ह्यांमधील १२ सहकारी बॅंकांची निवडणूक प्रक्रिया या आदेशानुसार सुरू झाली आहे. पुढील टप्प्यात राज्यातील १५ बॅंकांच्या निवडणूका होणार आहेत. यामध्ये सोलापूरसह विदर्भातील बॅंकांचा समावेश आहे.
जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यास २५ ऑगस्टपर्यंत प्रारूप मतदार यादी सादर करण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या असून ३ सप्टेंबर रोजी या प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द केल्या जाणार आहेत. १३ सप्टेंबरपर्यंत यातील हरकती व त्यावर सुनावणी होईल. २२ सप्टेंबरपर्यंत यावर अंतिम निर्ण्य होऊन यादी २७ सप्टेंबर रोजी प्रसिधद् केली जातील.
थोडक्यात दिवाळीच्या काळात जिल्हा बॅंकांच्या निवडणूका होतील. अर्थात पुणे जिल्हा बॅंकेने त्यांच्या कामगार भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. आता ही भरती होणार की, निवडणूक आचारसंहितेच्या घोंगड्यात ती भिजत राहणार हा खरा प्रश्न आहे. तर यासाठी ज्यांनी फिल्डींग लावली आहे, त्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.