सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सुरवड येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन दहावीच्या इयत्तेत १०० टक्के गुण मिळवलेल्या कल्याणी माने हिची भेट घेतली होती. आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, त्यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी कल्याणीची भेट घेत कल्याणीवर कौतुकाचा वर्षाव केला व रोख एक लाख रुपयांची मदत तिच्या शिक्षणासाठी केली.
सुरवड येथील कल्याणी तुकाराम माने हिने प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेतले. केवळ शिक्षणच घेतले नाही, तर दहावीच्या इयत्तेत १०० पैकी १०० टक्के गुण मिळवत आपल्या आईवडीलांच्या नावाचा नावलौकिक वाढवला. या अमाप यशानंतर शिक्षकांपासून ते स्वयंसेवी संघटनांपर्यंत सारेच तिच्या घरी भेट देण्यासाठी गेले. त्यानंतर तिच्या परिस्थितीची कल्पना जसजशी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नागरिकांना येऊ लागली, तसतसा त्यांचाही ओघ वाढला आहे.
आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी कल्याणीच्या घरी भेट दिली व तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्विकारून तिला १ लाखांची भेट दिली. यावेळी सारीका भरणे, दत्तात्रेय तोरसकर यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी तिची आई स्वाती माने यांच्याकडून सारीका भरणे व दत्तात्रेय भरणे यांनी अधिक माहिती घेतली व कल्याणी हिचे कौतुक केले. तिचा आदर्श नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनी घ्यावा व कोणतीही आर्थिक स्थिती व गुणवत्ता याचा काहीएक संबंध नसतो याचा धडा घ्यावा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, सुरेश शिंदे, बंडू गायकवाड, लक्ष्मण कोरटकर, कल्याणी हिचे आजोबा व घरातील नातेवाईक उपस्थित होते.