किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
सणसर (ता. इंदापूर) येथील रहिवासी ,छत्रपती शिक्षण संस्थेचे शिक्षक, सणसर विकास मंचाचे सक्रिय सदस्य कै रवींद्र खवळे ( सर ) यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन!
समाजात मुक्तहस्ते मिसळणारा, मदतीला धावणारा आणि सतत समाजकार्याची तळमळ असलेला हरहुन्नरी कलाकार, चतुरस्त्र शिक्षक मागील वर्षी काळाने समाजातून ओढून नेला. कोरोनामुळे दवाखान्यात मृत्यूशी झुंज देत असताना ४ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले.
सणसरच्या प्राथमिक शाळेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत असतात. या शाळेची भौतिक अवस्था अत्यंत खिळखिळी झाली होती.या शाळेसाठी गावातील सर्व तरुण एकत्र येऊन त्यांनी सणसर विकास मंच या ग्रुपची स्थापना केली. या कार्यात सरांचे फार मोठे योगदान होते.
लोकसहभागातून ग्रामीण विकासाची संकल्पना सरांनी गावातील तरुणांच्या मनात रुजवली. वृक्षारोपण करणे, गावातील प्लास्टिकचा कचरा गोळा करणे, शाळेसाठी भौतिक आणि बौद्धिक साहित्याची निर्मिती करणे, मुलांना त्यांचे छंद जोपासता यावेत म्हणून शिक्षणाबरोबरच खेळ, संगीत या क्षेत्रातही त्यांनी भरीव योगदान दिले.
आदर्श शिक्षक, सूत्रसंचालक व तरुणांना एकत्र बांधून ठेवणारा कुशल संघटक हे गुण सरांच्यात उपजतच होते. त्यांना सणसर विकास मंच व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली.
प्रशांत काटे, अध्यक्ष श्री छत्रपती शिक्षण संस्था : खवळे सरांची आपल्या कामावर निष्ठा होती. विद्यार्थ्यांमध्ये एकरूप होऊन ते शिकवत असत. ते संस्कृतिक कार्याबरोबरच ,शैक्षणिक कार्यातही वेगवेगळे उपक्रम राबवत असत.नवीन पिढी घडवणे ,शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते आदरयुक्त, नम्रतापूर्ण असावे यासाठी नेहमी सर कार्यरत असत. अतिशय चांगले, होतकरू शिक्षक संस्थेने गमावले आहेत त्यामुळे विद्यार्थी व संस्थेचे त्याचबरोबर समाजाचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.
ॲड रणजीत निंबाळकर, सरपंच, सणसर ग्रामपंचायत : उत्कृष्ट शिक्षकाचे त्याचबरोबर सांस्कृतिक व सामाजिक असे तिहेरी गुण सरांच्यात होते. सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत,हलाखीत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे सर स्वतः प्रत्येक वर्षी दोन ते तीन हुषार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचा सर्व खर्च ते स्वतः करायचे. सर उत्कृष्ट संघटक होते. गावच्या विकासात नेहमीच सहभागी होत होते. त्यांची आज आम्हाला फार मोठी उणीव भासते. त्यांच्या जाण्याने सणसर गावची फार मोठी हानी झाली आहे.
विक्रमसिंह निंबाळकर, संस्थापक सदस्य, सणसर विकास मंच : खवळे सर हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. समाजकार्यात, शैक्षणिक कार्यात तसेच सणसर विकास मंच च्या रूपाने गावात लोकसहभागाची चळवळ उभी करण्यात त्यांचे फार मोठे योगदान होते. असे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही. सरांची आठवण त्यांच्या कामातून नेहमीच येते सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेऊन पिढी घडविण्याचे मोठे काम सरांनी केले.