माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. २३ भोर पंचायत समितीच्या सभापतीपदी लहूनाना शेलार यांच्या नावाचा राष्ट्रवादी पक्षाने आदेश काढूनही आयत्यावेळी नाट्यमयरित्या सभापतीपदी दमयंती जाधव यांची वर्णी लागली होती. निवडीनंतर त्यांनी स्वतः हुन पत्रकार परिषद घेऊन सहा महिन्यानंतर सभापती पदाचा राजीनामा देऊन सन्मानाने शेलार यांनी सभापती पद देण्याचे जाहीर केले होते.
मात्र सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण होऊनही अद्याप दमयंती जाधव यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला नाही, त्यामुळे जाधव यांनी दिलेला शब्द पाळणार का? याकडे तालुक्याचे लक्ष लागुन राहिले आहे.
सहा महिन्यापुर्वी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा व्हीप डावलून बंडखोरी करत सभापतीपदी विराजमान झालेल्या भोरच्या सभापती दमयंती जाधव यांनी निवडीनंतर सहा महिन्यानंतर राजीनामा देणार या केलेल्या घोषणेनुसार आता राजीनामा देणार काय याबाबत भोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह राजकीय आघाडीवर कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
भोरचे सभापती श्रीधर किंद्रे यांनी ३० जानेवारी २०२१ रोजी राजीनामा दिला होता. पंचायत समितीवर एकहाती राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने ठरल्यानुसार लहुनाना शेलार यांना सभापती करण्यासाठी राष्ट्रवादीच्या चारही सदस्यांना जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी व्हीप वाजवला होता.
मात्र हा व्हीप डावलत सदस्य दमयंती जाधव यांनी सभापती पदासाठी अर्ज दाखल करुन काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य यांचे मतदान घेत सभापतीपद मिळवले होते. राष्ट्रवादी श्रेष्ठींचा आदेश डावलल्या प्रकरणी लहुनाना शेलार यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती.
या दरम्यान सभापती दमयंती जाधव यांनी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचाच असून पक्षाच्या विरोधात आम्ही जाणार नाही. सन्मानाने सहा महिन्याने सभापतीपदाचा राजीनामा देऊ अशी भुमिका स्पष्ट केली होती.
१८ फेब्रुवारी २०२१ रोजी सभापतीपदाची निवडणुक होऊन जाधव सभापती झाल्या होत्या व १८ आँगस्ट २०२१ रोजी सहा महिने पुर्ण झाल्याने राजकीय कार्यकर्त्यांची सभापतींच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे असून सभापती जाधव यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे राजीनामा देणार काय ? असा सवाल होत असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत.
पक्षाचे नेहमी आदेश पाळणारे प्रामाणिक लहूनाना शेलार यांच्याबाबत राष्ट्रवादी पक्ष काय भुमिका घेणार की नेहमीप्रमाणे अन्याय होणार? असा खडा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. तसेच दमयंती जाधव आणि श्रीधर कींद्रे यांना पुन्हा पक्षात घेऊन क्लीनचीट देऊन पक्षात घेतले जाईल का? यामुळे वेगळच राजकीय समीकरण बघायला मिळणार का? याकडे सुद्धा तालुक्याचे लक्ष लागून राहणार आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये नेमकी कोणती गणिते सुरू याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटतट बाजुला सारुन एकसंघता वाढली पाहीजे, तरच पुढील निवडणुकीत यश मिळणार आहे. यासाठी पक्षाच्या विरोधात जाणाऱ्या सदस्यांवर कारवाई होणे व पक्षशिस्त पाळणाऱ्या कार्यकर्त्यास सन्मान देणे गरजेचे आहे.
पक्षीय पातळीवर वरिष्ठांकडुन राजीनाम्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे मत राजकीय वर्तुळात उमटत आहे.
याबाबत सभापती दमयंती जाधव यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.