सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
राखी पौर्णिमेनिमित्त बहीण भावाचा एकत्रित तसेच वेगवेगळे छायाचित्र असलेला स्टॅम्प लावून भावाला राखी पाठविण्याची योजना टपाल विभागाने सुरू केली आहे. या आगळ्या वेगळ्या योजनेस बहीणींचा मोठया प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पुणे ग्रामीण डाक विभागाचे उपअधीक्षक गणेश वरूडकर यांनी दिली.
भावासाठी भेट म्हणून आपल्या भावाचे छायाचित्र असलेला स्टॅम्प अगर बहिणीसह भावाचा संयुक्त एकत्रित छायाचित्र असलेला स्टॅम्प लावून बहिणी त्यांच्या भावाला टपालातून राखी पाठविण्याचे योजनेस पुणे डाक विभागात मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
राखी पाठवण्यासाठी पुणे डाक विभागाने स्वतंत्र पाकीटे सर्व पोस्ट कार्यालयांत उपलब्ध करून दिली आहेत. यापुढेही लग्न,निरोप समारंभ, कौतुक सोहळा, वाढदिवस तसेच पत्रव्यवहार यासाठीच्या योजनांसाठी ही सेवा सुरू असून ग्राहकांनी डाक विभागाच्या समाजाभिमुख योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन वरुडकर यांनी केले आहे.