इंदापूर : महान्यूज लाईव्ह
निराधार परित्यक्ता तसेच अंध अपंग यांना शासनाकडून अनुदान मिळत असते व त्यावरच त्यांचे कुटुंब अवलंबून असते. त्यामुळे राज्य सरकार च्या माध्यमातून यांच्या अनुदानात कशी वाढ करता येईल याकरीता मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्याचे अनुदान वाढविण्याचा प्रयत्न करेल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे दिले.
इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.त्यावेळी खा.सुळे बोलत होत्या.
खा.सुळे म्हणाल्या, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सागर मिसाळ व सर्व समिती सदस्य करत आहेत. भविष्यात इंदापूर मधील संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्रात एक नंबर असेल असे सांगत इंदापूर येथील संजय गांधी निराधार समितीचा संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा, असे ही आवाहनही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील एकही गरजू कुटुंब लाभापासून वंचित राहणार नाही. येणाऱ्या काळात महाराजस्व अभियानातून तालुक्याती गावोगावी जाऊन नागरिकांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ यांनी लाभार्थी कुटुंबांना मिळणारे अनुदानामध्ये वाढ करून ते तीन हजार रुपये करावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केली.
खा.सुळे यांनी हा प्रश्न केंद्रात उपस्थित करून अनुदान कसे वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सागर मिसाळ, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य नितीन शिंदे, हनुमंत कांबळे, रहेना मुलानी, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले, माजी सदस्य प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, अक्षय कोकाटे, शेखर काटे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष सागर मिसाळ यांनी प्रास्ताविक केले, तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सद्यस्थितीचा आढावा घेतला. गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी उपस्थितांचे आभार मानले