किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष, छत्रपती कारखान्याचे माजी चेअरमन पृथ्वीराज जाचक यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची गोविंद बाग, माळेगाव येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
एकेकाळी विरोधक असणारे पृथ्वीराज जाचक यांचे छत्रपती कारखान्याच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मनोमीलन मागील काही दिवसांपूर्वी झाले. तेव्हापासून छत्रपती कारखान्यातील कामकाज पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. जाचक यांचा साखर धंद्यातील अनुभव मोठा आहे. कुशल प्रशासक म्हणून त्यांनी काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर जाचक छत्रपती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या महत्त्वाच्या व धोरणात्मक विषय असणाऱ्या मीटिंगसाठी उपस्थित असतात.
आज पृथ्वीराज जाचक हे पवार कुटुंबियांच्या भेटीला गेले होते. काल जाचक यांनी बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली होती. आणि त्यानंतर आज लगेचच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
राजकारण राजकारणाच्या जागी परंतु वैयक्तिक संबंध हे वेगळे असतात असे नेहमीच जाचक आपल्या भाषणातून व्यक्त करत असतात. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमागे छत्रपती कारखान्याशी निगडित भविष्यकाळातील काही विषय आहे का? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. मात्र याविषयी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. ही नेहमीची सदिच्छा भेट होती असे त्यांनी सांगितले.
पृथ्वीराज जाचक ,माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साखर संघ, मुंबई : पवार साहेबांशी झालेली आजची भेट ही सदिच्छा भेट होती. साखर धंद्याविषयी चर्चा झाली. पवार साहेबांकडून वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळत असते. मी नेहमीच पवार साहेब, सुप्रियाताई सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटत असतो. राजकारण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे मी छत्रपती कारखाना सावरण्यासाठी, चांगल्या कामासाठी एकत्र येत आहे. ही संस्था टिकविण्यासाठी छत्रपतीचे सभासद, कामगार आणि संस्थेच्या पारदर्शी कारभाराची निष्ठा हीच माझी प्रतिष्ठा आहे. कारखान्यावर सर्व सभासदांचे प्रपंच अवलंबून आहेत.