किशोर भोईटे, महान्यूज लाईव्ह
2012 पासून तालुक्यातील जनतेच्या सेवेत आहे. 2012 च्या अगोदर तालुक्यातील गावातील विकासाची काय अवस्था होती? फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नातेवाईक, पै पाहुणा आणि जाती -पातीचे राजकारण करायचे काम विरोधकांनी केले. पण विकास हा माझ्या रक्तातच आहे. जात-पात मी पाहत नाही असे मत महाराष्ट्राचे वन, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सपकळवाडी येथे बोलताना व्यक्त केले.
सपकळवाडी येथे कोरोना लसीकरणाच्या पहिल्या डोसचे संपूर्ण लसीकरण समारोप प्रसंगी ते बोलत होते. सपकळवाडी गावाने 1082 लाभार्थ्यांना पहिल्या डोसचे संपूर्णपणे लसीकरण करून घेतले.
त्यामुळे या गावाचे नाव जिल्ह्यात मोठ्या गावातील लसीकरणाच्या बाबतीत अग्रक्रमाने घेतले जाते. सपकळवाडी ग्रामपंचायत नेहमीच विकास कामांच्या बाबतीत एक पाऊल पुढे असते. त्यामुळे मलाही निधी देताना आनंद होतो. चांगले काम करताना अडचणी येतात, मात्र त्यावर मात केली पाहिजे. तालुक्यातील नागरिकांना आरोग्याशी निगडीत समस्यांसाठी मुंबईत कक्ष उभारून त्याद्वारे नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या काळात प्रशासनातील शिपाई पासून ते तहसीलदार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच झोकून देऊन काम केले आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचारी हेच खरे आपले हिरो आहेत. असेही भरणे यावेळी म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनामुळेच गावांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. भविष्यातही गावाचे नाव राज्यात आदर्श होईल असे मत व्यक्त केले.
सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवॅक्सिन व कोवीशिल्ड लसीचे अपुरे डोस येत आहेत. गावची लोकसंख्या खूप मोठी असल्यामुळे शंभर-दीडशे डोस पुरत नाहीत. त्यामुळे अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लसीकरणाचे ज्यादा डोस उपलब्ध व्हावेत यासाठी वरिष्ठ पातळीवर सूचना करावी. ही मागणी सणसरचे सरपंच ॲड रणजीत निंबाळकर यांनी केली होती.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब सपकळ, अॅड रणजीत निंबाळकर, छत्रपती कारखान्याचे संचालक डॉ दीपक निंबाळकर, नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, सपकळवाडीच्या सरपंच रोहिणी सोनवणे, राष्ट्रवादीचे विनोद सपकळ, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष तुषार सपकळ, शिवाजी सपकळ, ग्रामसेवक जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात काटेवाडी- भवानीनगर येथील यशश्री हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. राकेश मेहता, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे पद्माकर धर्माधिकारी, आरोग्य सेविका संगीता कोकरे, आरोग्य सहाय्यक ईर्षा सोलापुरे, आशा स्वयंसेविका रेखा मोरे यांचा सन्मान करण्यात आला.