दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
सातारा जिल्ह्यात फलटण व सातारा तालुक्यातील “डीपी’ चोरून त्यातील तांब्यांच्या तारा विकणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने व सातारा तालुका पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी जिल्ह्यातील फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावळी, सातारा तालुक्यातील “डीपी’ चोरून शेतकऱ्यांना अंधारात ठेवून मोठे नुकसान केल्याने पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी याबाबत कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यात गेली एक वर्ष फरार असलेल्या संशयित आतेश उर्फ अत्याचार विज्या उर्फ मुंजेश काळे (रा. रेवडी,ता.कोरेगाव) याच्या मागावर एलसीबीचे पथक होते.
त्याला 18 ऑगस्ट रोजी एलसीबीने ताब्यात घेतल्यानंतर त्याने तपासादरम्यान सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मारामारी तसेच फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहकाऱ्यांच्या मदतीने “डीपी’ चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली.
त्याच्याकडे कसून तपास केला असता, त्याने मर्द रमेश भोसले (रा. भुरकवडी,ता.फलटण) याचे नाव घेतल्याने पोलिसांनी त्याला झणझणे (ता. फलटण) येथून ताब्यात घेतले. भोसले याने फलटण, कोरेगाव, खंडाळा, वाई, जावळी, सातारा तालुक्यात डीपी (विद्युत रोहित्र) चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच इतरही साथीदारांची नावे सांगितल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
संशयितांनी एकूण चोवीस “डीपी’ चोरून त्यातील लाखो रूपये किंमतीच्या 200 किलो तांब्याच्या तारा विकल्याची कबुली दिली. एलसीबीने संशयितांच्याकडून 16 हजार 375 रूपयांच्या 65 किलो तांब्याच्या तारा, गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक दुचाकी, संशयितांनी चोरी केलेल्या दोन दुचाकी असा 76 हजार 375 रूपयांचा मुद्देमाल एलसीबीने हस्तगत केला आहे.
ही कारवाई एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, रमेश गर्जे यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली. तसेच सातारा तालुका पोलिसांनी “डीपी’ चोरीतील फरारी संशयित कोंडिबा लक्ष्मण माने (रा. चिखली, ता. सातारा) याला अटक करून त्याच्याकडून जिल्ह्यातील उंब्रज,पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीपी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आणले आहेत.
माने याने चाळकेवाडी परिसरातील डीपी’ चोरीचा गुन्हा करून तो गेली दोन वर्षे फरार होता. पोलिसांना सापडू नये यासाठी तो वेळोवेळी त्याचा राहण्याचा पत्ता बदलत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली होती.
मात्र, त्याच्या मागावर असलेल्या सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याची गोपनिय माहिती काढून तो ठोसेघर परिसरात आल्याची माहिती मिळताच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, हवालदार दादा परिहार, सुजीत भोसले, नितीराज थोरात, सतीश पवार, सागर निकम, महादेव घाडगे यांनी केली.