इंदापूर : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस मधील कार्यकर्त्यांमधील एकमेकाविषयी कलह काही केल्या बंद होईना. यामुळे तालुक्यात सत्ताकारण करताना त्याचा थेट राजकारणावर विपरीत परिणाम होत असल्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट जाहीर सभेत खासदार सुप्रिया सुळेंसमोरच कार्यकर्त्यांना झाडले.
ज्याला कोणाला रुसायचं, फुगायचं, भांडण करायचं असेल, कृपा करुन त्यांनी घरी बसले तर हरकत नाही अशा जहरी शब्दात भरणे यांनी उपस्थित असणाऱ्या आपल्यावर नाराज असणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा कडक शब्दात समाचार घेतला.
भर कार्यक्रमात भरणे यांनी तोफा डागल्याने काही कार्यकर्त्यांना झटका बसला आहे. अगदी संताप व्यक्त करत भरणे यांनी कार्यकर्त्यांना धारेवर धरले. काय होतं आपल्या गंगावळण ला? कसे केले रस्ते…जरा सांगा…वाजवा जरा…वाजवा ! सगळ्यांनी वाजवल्याशिवाय काही खरं नाही तुम्हाला मी सांगतो.ज्या राष्ट्रवादी पक्षात काम करतात त्या पक्षाचे सगळीकडे नांव घ्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना माझे सांगणे आहे, तुम्हाला विकासाचा निधी खुप मिळतोय परंतु सांगण्यासाठी आपण लोक खुप कमी पडतोय. आपापल्यातील भांडणे थोडी कमी करा ! ज्याला कोणाला रुसायचं असेल, फुगायचं असेल भांडण करायचं असेल कृपा करुन त्यांनी घरी बसले तर हरकत नाही.
परंतु राष्ट्रवादी आपली एकसंघ राहिली पाहिजे अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपला त्रागा व्यक्त केला.
इंदापूर तालुक्यातील झगडेवाडी ग्रामपंचायत येथील 2 कोटी 3 लक्ष रुपयाच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व 85 लाख रुपयाच्या प्रस्तावित विकास कामाचे भूमीपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे अध्यक्षस्थानी होते.
भरणे म्हणाले की, आपल्याला चांगले काम करायचे आहे. हे गट तट शेवटी आपण हे कोणासाठी करतोय? आपल्या नेत्याची ही शिकवण नाही. आपण जे करतोय ते नेत्यासाठी करतोय. काय तुम्हाला कमी आहे ? सरकार तुमच्या बरोबर आहे. दादा ताई तुमच्या बरोबर आहेत.
अरे या राज्याची तिजोरी तुमच्या बरोबर आहे.त्यामुळे तुम्हाला जी कामे करुन घेता येतील तेवढी कामे करुन घ्या. पक्ष हेच आपले कुटुंब आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांत एकदिलाने काम करा. जिल्हा परिषदेत आपली संख्या कशी वाढेल, नगरपरिषदेवर आपली सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मंत्री भरणे यांनी केले.