नगर : महान्यूज लाईव्ह
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या आत्महत्या करण्याचा ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय आणि शासकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. दरम्यान याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. या क्लिपच्या चौकशीसाठी 3 महिला अधिकाऱ्यांची समितीची स्थापना केली आहे. ही समिती चौकशी करून आपला अहवाल आयोगाकडे सादर करणार आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींचा होत असलेला त्रास आणि तक्रार करूनही वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगत आत्महत्येचा इशारा देणारी ऑडिओ क्लिप देवरे यांनी जारी केली होती. ती व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही खळबळ उडाली. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली आहे. यात उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील आणि तहसीलदार वैशाली आव्हाड यांचा समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणाची कोणतीही नोंद केली नाही. मात्र, दखल घेतली आहे.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस अधिकाऱ्यांनी देवरे यांच्याशी संवाद साधला आहे. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, यासंबंधी पोलिसांकरवी त्यांचे समुपदेशन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. तसेच राजपत्रित अधिकारी महासंघानेही सरकारला निवेदन देऊन चौकशी करून संबंधितांवर चौकशीची मागणी केली आहे