माळशिरस तालुक्यात घडलेल्या घटनेने राज्यात राज्यात खळबळ
सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
गावचे प्रथम नागरिक म्हणून सरपंच भूषविताना गावातील स्मशानभूमीसाठी विशेष प्रयत्न करणारे सरपंच दशरथ साठे यांच्याच भावाचा काल मृत्यू झाला. मात्र स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास गावातील काही जणांनी जमीनीचा वाद असल्याचे सांगत विरोध केल्याने नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यसंस्कार केले.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे माळवाडी (बोरगाव) येथील या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांनी ही घटना गांभिर्याने घेऊन ज्यांनी विरोध केला, त्या १३ जणांच्याविरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला.
समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त करणाऱ्या या घटनेची थोडक्यात माहिती अशी, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मौजे माळवाडी (बोरगाव) येथील मातंग समाजाचे माजी सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचे काल (दि. 20) 2 वाजता निधन झाले होते.
परंतु गावातील गुंडप्रवृत्तीच्या काहीजणांनी त्यांचा अंत्यविधी स्मशानभूमीत करण्यास विरोध केला. मग मातंग समाजातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी व साठे यांच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करून स्मशानभूम मध्ये अंत्यविधीला विरोध केला, म्हणून नातेवाईकांनी माळवाडी (बोरगाव) या ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार केला. या घडलेल्या घटनेची अकलूज पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. याबाबत पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पोलिसांनी रवींद्र शहाजीराव पाटील, गजेंद्र भिमराव पांढरे, चंद्रकांत मारुती पांढरे, संभाजी नाथाजी कुदळे, जयराम मच्छिंद्र कुदळे, भगवान बाबुराव कुदळे, रामचंद्र मच्छिंद्र पांढरे, राहूल शिवाजी कुदळे, विनायक शिवाजी कुदळे, प्रविण मधुकर कुदळे, सुभाष सदाशीव पांढरे, संदीप भगवान कुदळे, अमोल दत्तात्रेय कुदळे यांच्याविरोधात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केल्यानुसार वरील आरोपींनी अॅट्रॉसिटीची तक्रार अगोदर मागे घे, अन्यथा आमच्या शेतातून अंत्यविधीसाठी जायचे नाही, जाणारा रस्ता आमचा आहे असे सांगून त्यांनी अंत्यविधी अडवला अशी फिर्याद विमल सुरेश साठे यांनी दिली.