बारामती : महान्यूज लाईव्ह
लाख मेले तरी चालतील, मात्र लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे अशी एक म्हण आपल्याकडे रुढार्थाने प्रसिध्द आहे.. मात्र आता लाखांच्या पोशिंद्यालाच मारून त्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सुरू आहे, त्यातूनच गेल्या १८ वर्षात कधीही कोसळले नव्हते, एवढे भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. अर्थात किरकोळ बाजारात मात्र अजूनही भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेले आहेत.
आज बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची येथील उपबाजारातील लिलावाला भेट दिली असता शेतकऱ्यांचे विदारक वास्तव समोर आले. काकडीची १० किलोंची पिशवी ५० रुपयांना विकली जात होती. कोबी, फ्लॉवर नगामागे ५ ते ६ रुपयांना विकला गेला. विशेष म्हणजे फ्लॉवरची शेती करताना त्याचे रोप देखील १.५० रुपयांना बसते. मग त्याचे खत, मल्चिंग पेपर, लागवडीसाठी केलेल्या मशागती, लागवडीचा खर्च, औषधाचा खर्च, काढणीचा खर्च हे सारे पाहिले, तर त्यावरील एका रोपाचा खर्चच मुळी १० ते १५ रुपयांवर पोचतो. असा कोबी किंवा फ्लॉवर जर पाच रुपयांना विकला गेला तर त्या शेतकऱ्याने काय करावे?
आज टोमॅटो फक्त अडीच रुपये किलोने शेतकऱ्यांकडून खरेदी केला गेला. सिमला मिरची, काकडी, दोडका यांचीही गत अशीच होती. अर्थात हीच काकडी किरकोळ बाजारात मात्र विक्रेत्यांनी ४० रुपये किलोच्या दरावर विकायला सुरू केली होती. तर अडीच रुपयांचा टोमटो १५ रुपये किलो, काकडी २० रुपये किलो, दोडका ४० रुपये किलो या दराने विकला गेला.
अर्थात आतापर्यंत भाजीपाल्याचे भाव कोसळले नाहीत असे नाही. मात्र एकाच वेळी सर्वच भाजीपाल्याचे दर कोसळण्याची ही पहिलीच घटना असल्याचे व्यापारी, विक्रेत्यांनीही सांगितले. शेतकरीही घाम गाळून, सर्व प्रकारचे धोके पत्करून जेवढा भाव मिळवत नाही, त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे केवळ एका जागी बसून विकणाऱ्यांना मिळतात हे वास्तव पचायला जड जात आहे.
आज बारामतीतील जळोची येथील बाजारात टोमॅटो घेऊन आलेल्या एका शेतकऱ्याने आपली कैफियत सांगताना उलट्या पट्टीचा अनुभव सांगितला. १६०० रुपये कालपुरताच खर्च आलेल्या टोमॅटोचे आजच्या लिलावात १४०० रुपये हातात आले. वाहतूकदार, मजूर, व्यापारी, औषध कंपन्या यांचीच आम्ही आजवर भरती केली असा त्रागा या शेतकऱ्याने व्यक्त केला.
बारामतीतील व्यापारी किशोर जाधव यांनी गेल्या १८ वर्षात आजएवढा भाजीपाल्याची वाईट अवस्था कधीच झाली नसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना माल तोडू नका, आणू नका असे सांगायची वेळ आली हे सर्वात वाईट आहे. ऐन श्रावणातही भाजीपाल्याला उठाव नसल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जाधव यांनी सांगितले.