किशोर भोईटे : महान्यूज लाईव्ह
भवानीनगर : ग्रामीण भागातील महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन राबविले जात आहे. त्यामार्फत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत की आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उमेद अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सीआरपी, लिपिक, बँक सखी यांचा सत्कार या अभियानाचे समन्वयक डी.जे. राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन करण्यात आला.
या उपक्रमांमध्ये सणसर, भवानीनगर, हिंगणेवाडी येथील महिलांचे उमेद अभियानात स्वयंसहायता समूह गट तयार करण्यात आलेले आहेत. या गटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ग्राम संघ स्थापन करण्यात आलेले आहेत.
निर्भया कल्पवृक्ष व आशीर्वाद या महिला ग्राम संघाचे समुदाय गुंतवणूक विकास निधीचे 21 लाख रुपयांचे प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये 34 महिला स्वयंसहायता गटांचे मागील एक वर्षाचे सूक्ष्म गुंतवणूक आराखडे तयार करून त्यांना विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या उपक्रमासाठी सणसर, लासुर्णे प्रभाग समन्वयक डी.जे.राऊत, सीआरपी कामिनी चव्हाण, राजमाला गायकवाड, रेश्मा चव्हाण, सुरेखा चव्हाण, प्रिया जगदाळे, बँक सखी फातिमा शेख, ग्रामसंघाच्या अध्यक्षा मनीषा चव्हाण, कविता वाळके, सचिव कांचन निंबाळकर, स्वाती विभुते, कोषाध्यक्ष दिपाली गायकवाड व सदस्य उपस्थित होते.