सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
अकलूज – वेळापूर रस्त्यावरील माळेवाडी येथे मालवाहतूक करणारा कंटेनर आणि दुचाकी वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात वेळापूर येथील मायलेकी जागीच ठार झाल्या, तर मुलगा गंभीर जखमी झाला.
हा अपघात एवढा भीषण होता की कंटेनर खाली गेलेल्या मायलेकी जवळपास १०० मीटर पर्यंत फरपटत गेल्या. आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर) आजारी असल्याने आईसह बहीणीला घेऊन मुलगा निघाला होता. याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत अकलुज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओंकार पांडुरंग दांडगे (वय २० रा.वेळापूर) हा आई छाया पांडुरंग दांडगे (वय ४५ रा.वेळापूर) आजारी असल्याने आपली बहीण सृष्टी पांडुरंग दांडगे (वय १८ रा. वेळापूर) हिच्यासोबत दुचाकी (क्र. MH 01 AS 2370) वरून अकलूज येथील दवाखान्यात उपचारासाठी निघाल्या होत्या.
माळेवाडी येथील प्राथमिक शाळेजवळ मागून येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (क्र. KA 01 AH 5951) ने जोरदार धडक दिली. यामध्ये छाया दांडगे व सृष्टी दांडगे यांचा जागीच मृत्यू झाला.
ओंकार दांडगे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. याबाबत विनोद राजकुमार पवार (रा.वेळापूर) यांनी अकलूज पोलिसांत फिर्याद दिली.
कंटेनर चालक शिव शंकर हाजी बसप्पा (वय ४३ रा.नामकल तामिळनाडू) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिक तपास सपोनि वैभव मारकड हे करीत आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कंटेनर खाली गेलेल्या मायलेकी जवळपास १०० मीटर पर्यंत फरपटत गेल्या.
दरम्यान अपघातानंतर परीसारातील व स्थानिक लोकांची बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमल्याने काहीकाळ अकलुज – वेळापुर रोडवरील वाहतूक खोळंबळी होती. अकलूज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत करुन जखमीस उपचारासाठी हलवले व मृतदेह ताब्यात घेतले.