सांगली : महान्यूज लाईव्ह
महावितरणने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी वीजचोरी पकडली. महावितरणच्या सांगली युनिटने मिरज तालुक्यातील माधवनगर येथील महिला उद्योजकाने टेक्सटाईल मधून तब्बल 21 लाख युनिटची वीज चोरी केल्याचे व त्याद्वारे चार कोटी 40 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महावितरणच्या फिर्यादीवरून सांगली शहर पोलिसांनी संगीता नीरजकांत गुप्ता या महिला उद्योजकांवर 4 कोटी 40 लाख रुपयांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात महेश राऊत या अभियंत्यांनी सांगली शहर पोलिसांकडे फिर्याद दिली. राऊत हे सांगलीच्या महावितरण कंपनीच्या भरारी पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदावर आहेत. महावितरणच्या पुणे परिक्षेत्राच्या उपसंचालकांनी दिलेल्या आदेशानुसार वीज चोरी करणाऱ्या व्यक्ती आणि ठिकाणे शोधून काढून त्यांच्यावर विद्युत कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार राऊत हे त्यांच्या माधव नगर येथील शाखा कार्यालयातील कर्मचारी आर. एफ. तडवी, अक्षय खर्चे, वरिष्ठ तंत्रज्ञ अमित नारे, वसंत कोंडीबा सकटे, सहाय्यक अभियंता विजयसिंह पाटील या कर्मचार्यांसह मिरज तालुक्यातील माधवनगर येथील गुप्ताजी टेक्सटाईल्समध्ये पोहोचले.
ही टेक्सटाईल मिल संगीता नीरजकांत गुप्ता यांच्या नावाने असून या ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज मीटरची आणि विद्युत संचाची तपासणी करण्यासाठी हे पथक पोहोचले. त्यावेळी तेथे असलेले जगन्नाथ रंगराव पाटील यांच्याकडे वीज बिलाची मागणी केली, त्यावर वीज बिले येथे नाहीत. ती मालकांकडे असतात, त्यानुसार त्यांनी माहिती दिली.
परंतु तोपर्यंत राऊत यांनी पोर्टलवरून बिले काढली होती त्या बिलांमध्ये शंका होती. त्यामुळे या पथकाने तेथे तपासणी करण्यास सुरुवात केली. टेक्स्टाईलच्या गेटच्या बाहेर अंतर्गत रस्ता रस्त्याच्या बाजूला कंपाऊंड भिंतीच्या जवळ विद्युत रोहित्र बसवलेला आहे, त्याच्या बुशिंग मधून काळ्या रंगाची केबल इमारतीच्या भिंतीवर बसवलेल्या लोखंडी पत्र्याच्या पेटीमध्ये मीटरला इन्कमिंग जोडल्याचे दिसून आले.
या ग्राहकाच्या मीटर प्रिमाईसमध्ये प्रवेश करताना गेटमधून आत गेल्यानंतर कंपाऊंड भिंतीच्या आत मध्ये डाव्या बाजूस भिंतीवर लोखंडी पत्र्याच्या बॉक्स असल्याचे दिसून आले. लोखंडी पत्र्याच्या बॉक्समध्ये डाव्या बाजूच्या वरील बाजूस मीटर आणि खालच्या बाजूस लाल रंगाची रिंग टाइप सिटी असल्याचे दिसून आले आणि उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये एमसीबी आणि खालील कप्पे मधून केबल काढून तिथे टेक्स्टाईलच्या आतमधील कंट्रोल पॅनलला म्हणजेच लोड मध्ये जोडलेली होती.
याची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर गुप्ताजी टेक्स्टाईल मध्ये वायरिंग व जोडणी मध्ये फेरफार करून मीटरच्या आणि पेजच्या शेतीमधून विद्युत प्रवाह वाहणार नाही अशी कायमस्वरूपी आणि प्रामाणिकपणे तजवीज केली होती हे दिसून आले.
जेणेकरून एकूण वापरापेक्षा मीटर दोन तृतीयांश इतका कमी वापराची नोंद घेईल. पर्यायाने वीज बिल कमी येईल. अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा वीज चोरीचा कालावधी मोठा असून चार कोटी 40 लाख 75 हजार 80 रुपये इतक्या रकमेची चोरी संगीता नीरज कांत गुप्ता यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राऊत यांनी फिर्याद दिली.
या पुढील तपास हवालदार संदीप तानाजी पाटील करत आहेत. गुप्ता यांनी 21 लाख 22 हजार युनिट वीज चोरी केली त्याची किंमत 4 कोटी 40 लाख 75 हजार रुपये होते. असा दावा महावितरणने फिर्यादी मध्ये केला आहे.
दहा वर्ष आतापर्यंतचे अधिकारी काय करत होते?
वीज चोरी पकडली.. तब्बल चार कोटींचे पकडली, याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांचे कौतुकच आहे अर्थात जी तडफ आणि धाडस राऊत यांनी दाखवले, ते आतापर्यंत इतर अधिकाऱ्यांनी का दाखवले नाही? असा प्रश्न मात्र या कारवाईच्या निमित्ताने समोर आला आहे.
याचे कारण असे की, ही चोरी गेली दहा वर्ष होत होती. मग दहा वर्षात वायरमन, स्थानिक शाखा अभियंत्यापासून ते कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंत्यापर्यंत इतरांचे लक्ष कसे या कडे गेले नाही? हा प्रश्न मात्र आता सांगली जिल्ह्यात उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या प्रकाराला जबाबदार धरून त्या त्या काळामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जावी अशी सामान्य खातेदारांची अपेक्षा आहे.