नगर : महान्यूज लाईव्ह
पुणे तिथे काय उणे?.. ही काय म्हण खोटी नाही.. पुणे जिल्ह्यातील थेऊर येथील जाधववस्तीत राहणाऱ्या संतोष साहेबराव देवकर व अशोक फकिरा चव्हाण या दोघांनी साधूचा वेष परिधान करून श्रीगोंदा तालुक्यात औषधी वनस्पती, औषध, रुद्राक्ष विकत होते. याखेरीज पैसे दुप्पट, तिप्पट करून देण्याची जाहीरातही अप्रत्यक्ष करायचे. अडचणीत असलेल्या लोकांची माहिती काढून ते या लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते.
या दोघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३.७५ लाखांची रोख रक्कम, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ताब्यात घेतली. हे दोघे साधूच्या वेशात फिरत होते. करमाळा तालुक्यातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या दत्तात्रेय महादेव शेटे यांना त्यांनी दुप्पट पैसे करून देण्याचे अमिष दाखवले होते.
या अमिषाला भुलून शेटे यांनी साडेचार लाखांची रोकड श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हिरडगाव फाटा येथे आणली व दोघांच्या ताब्यात दिली. तेथेच दुप्पट पैशाचा खेळ हे दोघे करून दाखवणार होते. त्यांनी सोबत लोखंडी पेटी आणली होती. या पेटीत पैसे ठेवून त्यांच्यावर मंत्रोपच्चार झाल्यानंतर हे पैसे दुप्पट, अगदी तिप्पट होणार असल्याचे अमिष चव्हाण व देवकर या दोघांनी दाखवले होते.
पैसे पेटीत ठेवतो असे सांगून या दोघांनी हातचलाखी केली. पेटी लगेच उघडून बघायची नाही असे सांगितले होते. पैशाची रक्कम फुलावर ठेवून शेटे यांच्या हातात त्यांनी तांदूळ दिला. डोळे मिटून प्रदक्षिणा घालण्यास सांगितली. उद्या सकाळपर्यंत पेटी उघडायची नाही असे सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शेटे यांनी पेटी उघडून बघितली असता, त्यात दुप्पट सोडा, ठेवलेले साडेचार लाखही नव्हते, त्यामुळे आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच त्यांनी श्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी या घटनेतील गांभिर्य लक्षात घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने तपास केला व गोपनीय खबऱ्यांमार्फत देवकर व चव्हाण यांचा ठावठिकाणा शोधून त्यांना ताब्यात घेतले.
ही कारवाई नगरचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक निरीक्षक दिलीप तेजनकर, फौजदार अंकुश ढवळे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रकाश राठोड यांच्या पथकाने केली.