पुणे : महान्यूज लाईव्ह
बळवंत पुरंदरे हे आरएसएसचे निस्सीम प्रचारक, छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाची मांडणी त्यांनी आरएसएसच्या नजरेतूनच केली. राज ठाकरे यांनी इतरांचेही सोडा, त्यांचे आजोबा प्रबोधनकारांनी पुरंदरेच्या इतिहास लेखनावर घेतलेल्या आक्षेपांची माहिती घ्यावी अशी टिका संभाजी ब्रिगेडच्या वतीने काल पुण्यात झालेल्या पत्रकार परीषदेत केली.
प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या फेसबुक पोस्टवरून त्यांना पुण्यात फिरू दिले जाणार नाही असे वक्तव्य नगरसेवक वसंत मोरे यांनी केले होते, त्यावर पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परीषद घेण्यात आली.
या पत्रकार परीषदेत ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर राजेभोसले, प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, उपाध्यक्ष छगन शेरे, संघटक प्रदीप कणसे, विभागाध्यक्ष प्रदीप बेलदरे, जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत, विशाल तुळवे, शहराध्यक्ष हर्षवर्धन मगदूम यांनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली व वसंत मोरे यांच्या इशाऱ्यालाही जोरदार प्रत्युत्तर दिले.
या पदाधिकाऱ्यांनी पुणे ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. देशात लोकशाही शासन असून घटनेने सर्वांना अभिव्यक्ती व संचार स्वातंत्र्य दिले आहे. संभाजी ब्रिगेड मुद्द्याला मुद्द्याने व गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देण्यास सक्षम असल्याचा सूचक इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
अमोल काटे म्हणाले, काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत जेम्स लेन कोण, तो कुठून आला, त्याने कसले पुस्तक लिहीले, तो आता कुठाय, त्या मुद्द्यावरून मराठा तरुणांना भडकावण्याचे डिझाईन तयार करण्यात आले असे सांगत जेम्स लेनचा मुद्दा निकाली काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र राज ठाकरे यांची ही पहिलीच वेळ नाही. पुरंदरेंच्या इतिहास मांडणीला समर्थन देण्यासाठी जेम्स लेनचा मुद्दा पुढे करण्याची ही राज ठाकरे यांची पहिलीच वेळ नाही. जर राज ठाकरे यांना जेम्स लेनविषयी काहीच माहिती नाही, तर मग सन २००३ मध्ये निष्ठावंत शिवसैनिकांनी जेम्स लेनला लिखाणासाठी मदत करणाऱ्या श्रीकांत बहुलकरांना काळे फासल्यानंतर पुण्याला येऊन त्यांनी माफी का मागितली होती?
या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज ठाकरे म्हणतात की, पुरंदरे ब्राम्हण असल्यानेच त्यांना विरोध केला जातो. मात्र हा त्यांचा का्ंगावा आहे. त्यांना पुरंदरेंच्या पलीकडचे इतिहासाचे काहीच माहिती नाही. सेतुमाधवराव पगडी, त्र्यं. शं. शेजवलकर, नरहर कुरुंदकर, कॉ. शरद पाटील, डॉ. आ.ह. साळुंखे, भालचंद्र नेमाडे, डॉ. जयसिंगराव पवार आदींनी इतिहास संशोधकांनी पुरंदरेंच्या इतिहास लेखनात टिका आणि आरोप केले आहेत. पुरंदरे यांनी आजपर्यंत कधीही या आरोपांचे खंडन केले नाही.
पुरंदरे यांनी मांडलेल्या शिवचरित्रामध्ये छत्रपती शिवरायांना एका धर्मापुरते मर्यादित करण्याचा प्रयत्न केला. शहाजीराजांना गैरहजर दाखवून शिवरायांच्या डोक्यावर दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी असे काल्पनिक गुरू बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच जेम्स लेनच्या विकृत लिखाणासाठी पार्श्वभूमी तयार करून मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज मराठा सरदार घराणी आणि स्त्रियांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. जेम्स लेनच्या पुस्तकाचा प्रचार करण्याचे काम त्यांनी केले.
शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद तिथीचा वाद देखील महाराष्ट्रात पुरंदरेंनीच निर्माण केला. महाराष्ट्रात पुरंदरेंना होणारा विरोध या कारणामुळे आहे. इतकेच नाही, तर पुरंदरेनी इतिहास लेखनाच्या नावाखाली अनेक सरदार घराण्यातील लोकांकडून इतिहासाचा दुर्मिळ ठेवा असणारे दस्तऐवज, कागदपत्रे, ताम्रपट, शस्त्रास्त्रे इत्यादी वस्तू नेल्या आणि त्या परत केल्या नाहीत. त्या वस्तूंचे पुढे काय झाले हे पुरंदरेनी महाराष्ट्र समोर येऊन सांगायला हवे.
राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचे समर्थन करताना जेम्स लेनच्या मुद्द्यावर भाष्य करून पुरोगामी संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर टीका केली होती. महाराष्ट्रात जातीयवाद पसरवण्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टद्वारे काही मुद्दे उपस्थित केले होते. राज ठाकरेंच्या समर्थकांना त्या मुद्द्याचा प्रतिवाद करता आला नाही, खंडन करता आले नाही असा आरोप या पदाधिकाऱ्यांनी केला.