सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या इंदापूर तालुक्यातील खोरोची येथील शंकर नगरे यांच्या घराला मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आपल्या डोळ्यासमोर घरात आगडोंब उसळल्याचे पाहून कुटुंबाने एकच टाहो फोडला.
लगेचच घराबाहेर पडत जीव मुठीत घेऊन पळत शेजारच्यांकडे धाव घेतली. शेजारचे आवाजाने जागे झाले, त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यामध्ये या आगीत घरातील सर्व धान्य, सर्व कपडे व वस्तू जळून खाक झाल्या.
शंकर नगरे यांचा कष्ट करून उभा केलेला प्रपंच उघड्यावर पडला असून, साधारणपणे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उघड्यावर आलेल्या नगरे कुटुंबाच्या संसाराला आपला हातभार लागावा या उद्देशाने तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने संस्थापक नानासाहेब खरात यांच्या वतीने कुटुंबास कपडालत्ता व अन्नधान्याचे किट देण्यात आले.
शंकर नगरे हे मासेमारी करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी रात्री आपली पत्नी व दोन पुतण्यांसह ते गाढ झोपी गेले होते.याच दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे रात्री अचानक घराला आग लागली. या आगीत त्यांच्या घरातील धान्य, साखरेचे पोते, युरिया, २ कपाटे, कपडे, रोख रक्कम, टीव्ही, डीव्हीडी, डिश, दागिने, बेड, भांडी, मासे-मारीची जाळी, फॅन अशा जवळपास तीन ते साडेतीन लाखांच्या सांसारिक वस्तू जळून खाक झाल्या.
गाढ झोपेत असल्याने सदर बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. घरातून कशाचा तरी बार झाल्या नंतर शंकर बाबू नगरे यांना जाग आली, बायकोला व 2 मुलांना बाहेर घेऊन आरडाओरड करत शेजारच्याकडे धाव घेतली, यावेळी 20 ते 30 लोक जमा झाले, लाईट चालू असल्यामुळे प्रथम वायरमनला फोन करून लाईट बंद केली. त्
यानंतर सर्वांनी पाण्याचा मारा करून तब्बल अर्ध्या तासाने आग आटोक्यात आणली, तो पर्यंत खूप उशीर झाला होता घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं होते.
या आगीत दैनंदिन वापराच्या वस्तूही जळाल्याने संसार उघड्यावर आलेल्या शंकर नगरे यांनी बुधवारी (दि.18)लोकांना गरजेच्या वस्तूंसह आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
नगरे कुटुंबीयांना दानशूरांनी मदत करावी
तेजपृथ्वी ग्रुपचे नानासाहेब खरात यांनी नगरे कुटुंबीयांची भेट घेतली. मुलांना कपडे, खाऊ, महिलांना साड्या, धान्य, किराणा किट देऊन मदत केली. नगरे कुटुंबीयांना गावातीलच नव्हे तर तालुक्यातील दानशूरांनी मदत करावी अशी अपेक्षाही नानासाहेब खरात यांनी व्यक्त केली.
यावेळी नगरे कुटुंब तसेच तेजपृथ्वी ग्रुपचे गणेश शिंगाडे, सोमनाथ वाघमोडे, महेश शिंदे आदी उपस्थित होते.