दौंड : महान्यूज लाईव्ह
राज्यातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभागाची महत्वाची कामगिरी बजावली, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले, आरोग्य विभागासह सर्व प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणा-या ग्रामिण भागातील आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून 1 जुलै पासून त्यांच्या मानधन देण्यात येणार आहे.
आशा वर्कर यांच्या मानधनात वाढ करावी, यामागणी साठी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या महिला
आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यास यश आले असून वैशाली नागवडे यांनी राज्य सरकारचे आभार मानत आभिनंदन केले आहे.
राज्य सरकारने मागील महिन्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. आरोग्य विभागाचा कणा असलेल्या आशा वर्कर व गटप्रवर्तक ज्यांची संख्या राज्यात ६५ हजाराच्या आसपास आहे. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत होते.
कोरोनाच्या काळात ग्रामिण भागात आशावर्कर यांनी जीवाची पर्वा न करता घरोघरी जावून आरोग्याचे काम केले आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात मानधन मिळावे यासाठी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता.
त्यानुसार राज्य सरकारने १ जुलै पासून आशा स्वयंसेविकांच्या मानधनात १ हजार रुपये तर गटप्रवर्तक यांना 1200 रूपये या प्रमाणे मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. हे मानधन आशा वर्कर यांना लवकरात लवकर मिळावे यासाठी वैशाली नागवडे यांनी नुकतीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी मानधनात वाढ केलेल्या निर्णयाबद्दल राज्यसरकारचे आभिनंदन केले आहे. या मानधनात वाढ केल्याने ग्रामीण भागातील आशा वर्कर असलेल्या महिलांना न्याय मिळाला असून त्यांना काम करण्यास यामुळे निश्चित प्रोत्साहन मिळाले असल्याचे वैशाली नागवडे यांनी सांगितले.