दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील कानगाव येथील निगडे वस्ती परिसरात बेकायदा वाळू साठयावर पाटस पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकला आहे. या पथकाने वाळू साठा जप्त करून कारवाई केली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी दिली.
कानगाव – गार हद्दीत भीमा नदी पात्रात रात्रीच्या सुमारास जेसीबी यंत्राच्या सहाय्याने बेकायदा उपसा करून त्याची विक्री करण्यासाठी साठा केल्याची माहिती पाटस पोलीस आणि महसूल विभागाला मिळाली होती.
त्यानुसार यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण, कानगावचे तलाठी प्रफुल्ल व्यवहारे, पोलीस पाटील बारवकर आदींनी पाटस – कानगाव रोडवर कानगाव हद्दीतील निगडेवस्ती येथे असलेल्या बेकायदेशीर वाळू साठ्यावर छापा टाकला.
यावेळी पाटस कानगाव रोडच्या कडेला बेकायदा वाळूसाठा केला असल्याचे निदर्शानास आले. तलाठी प्रफुल्ल व्यवहारे यांनी 10 ब्रास वाळूचा पंचनामा करून हा वाळू साठा जप्त केला आहे.
याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे पंचनामाचा अहवाल पाठविण्यात येणार असून पुढील कारवाई वरिष्ठ अधिकारी करतील अशी माहिती तलाठी व्यवहारे यांनी दिली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या रस्त्यांच्या नावाखाली स्थानिक काही वाळूमाफिया रात्रीच्या सुमारास भीमा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून त्याचा साठा करून त्याची विक्री करीत आहेत. या वाळू उपसा करणाऱ्यांची नावे पोलीस प्रशासन आणि महसलू विभागाला समजली असून, संबंधित वाळू माफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.