अनिल गवळी : महान्यूज लाईव्ह
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्यपालांच्या बारा आमदारांच्या निर्णयास विलंब होत असल्यावर पत्रकारांनी विचारले असता, पवार यांनी खोचकपणे वय झाल्यामुळे कदाचित हा प्रकार घडला असेल असे वक्तव्य केले होते.
त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली या टीकेचा खरपूस समाचार रुपाली चाकणकर यांनी घेतला. रूपाली चाकणकर यांनी गेल्या काही दिवसात खासदार नवनीत राणा, चित्रा वाघ यांच्यावर अशीच बोचरी टीका केली होती.
चाकणकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना ‘दादा तुमचे जेवढे वय, तेवढी पवार साहेबांची कारकीर्द! चार दिवस थांबून देखील तुम्ही प्रदेशाध्यक्ष असतानाही, दिल्लीत अमित शहा भेट नाकारतात. त्याबाबत अधिक आत्मचिंतन करावे. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत, हे कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना समजले पाहिजे अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.