सायकल यात्रेतून करणार व्यसनमुक्ती, पर्यावरण वाचविण्याचा संदेश
दौंड : महान्यूज लाईव्ह
दौंड तालुक्यातील राजेगाव येथील राजेंद्र कदम आणि पिंपळगाव येथील जयकुमार जावळे या दोन तरूणांनी स्वातंत्र दिनी 15 ऑगस्ट पासून मुंबई ते पश्चिम बंगाल पर्यंत सायकल संदेश यात्रेस सुरवात केली आहे. या तरूणांच्या उपक्रमाचे राजेगाव ग्रामस्थांनी स्वागत केले असून त्यांच्या या यात्रेस शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचे पश्चिम टोक असलेल्या मुंबईतील गेट वे ऑफ इंडियापासून ही सुरुवात झाली असून ते पुर्व टोक पश्चिम बंगाल येथे बंगालच्या उपसागरापर्यंत ते सायकलवर प्रवास करणार आहेत. या तरूणांनी 15 ऑगस्ट पासून सायकल यात्रेची सुरवात केली आहे.
31 ऑगस्ट पर्यंत ते सुमारे 2100 किलोमीटर अंतर सायकल प्रवास करणार आहेत. या प्रवासाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
या सायकल प्रवासात ते व्यसनमुक्त जीवन, चिंतामुक्त जीवन, सायकल चालवा- प्रदुषण टाळा, इंधन वाचवा, पर्यावरण वाचवा, आरोग्य वाचवा असा संदेश देऊन प्रवासा दरम्यान येणारा गावात आणि शहरांमध्ये जनजागृती करणार आहेत.
पिंपळगाव येथील जयकुमार जावळे यांनी यापूर्वी अनेक वेळा सायकलिंग करून १५ हजार कि.मी पर्यंत प्रवास करून पाणी वाचवा, बेटी बचाव-बेटी पढाओ असा संदेश दिला होता.
तर राजेगावच्या राजेंद्र कदम याने ही 10 हजार किमी सायकलचा प्रवास करून व्यसन मुक्ती पर प्रबोधन करून संदेश यात्रा केली असून महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराने सन्मानित केले आहे.
दौंड तालुक्यतील राजेगाव ग्रामपंचायतचे सरपंच प्रविण लोंढे व ग्रामस्थांच्या वतीने राजेंद्र कदम आणि जयकुमार जावळे यांचा सन्मान करून त्यांच्या प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मुकेश गुणवरे, नवनाथ लोंढे, अरुण भोई, बापुराव चोपडे, दिपक गायकवाड, योगेश वाघमारे, तानाजी थोरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.