माणिक पवार : महान्यूज लाईव्ह
भोर, दि. १७ : बहीण भावाचा पवित्र नातं असलेला रक्षाबंधन सण काही दिवसापूर्वी येऊन ठेपलेला असतानाच सख्ख्या चुलत भावाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना हवेली तालुक्यात घडली. याप्रकरणी राजगड पोलिसांनी 19 वर्षीय युवकास अटक केली. न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.
राजगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार एका महिन्यापूर्वी आरोपीच्या राहत्या घरात घडला आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सदर ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, उपनिरीक्षक निखिल मगदूम यांनी भेट दिली आहे. एकोणवीस वर्षीय नराधम चुलत भावाने फिर्यादी यांच्या १३ वर्षीय मुलीला मोबाईल मधील कार्टून दाखविण्याच्या अमिषाने जवळ बोलवुन तिचा विनयभंग केला व याबाबत कोणाला सांगितलेस तर तुला मारून टाकीन असा दम दिला. यावरून ही फिर्याद दाखल करण्यात आली असून पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहेत.