शेकापचे नेते राहुल पोकळे यांचे मनसेला प्रतिआव्हान..
पुरंदरेवरून सुरू असलेल्या वादात आता शेकापची ही उडी..
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा पुरोगामी विचारांचा नसून तो पुरोगामी चळवळीला वापरून फेकून देणारा पक्ष आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर राष्ट्रवादीच्या एकाही आमदार, नगरसेवक , पदाधिकाऱ्यांनी साधे एक शब्दांने ही उत्तर दिले नाही, राष्ट्रवादीने याचे चिंतन आणि आत्मपरिक्षण करावे, पण प्रविण गायकवाड हे पुण्यातच काय ते राज्यात कुठेही फिरतील हिम्मत असेल तर रोखून दाखवा,असे प्रतिआव्हान राष्ट्रसेवा समुहाचे संस्थापक अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते राहुल पोकळे यांनी दिले आहे.
मनसेचे नेते राज ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनी एका वाहिनीच्या मुलाखतीत पुरंदरे यांचे समर्थन करीत मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर यांना, कोण खेडेकर? असे विचारत टिका केली होती.
तसेच राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेनंतर जातीयवाद वाढल्याची टिका केली होती. या टिकेनंतर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी फेसबुकवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुरंदरे यांच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही अशी टिका केली होती.
यावर पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. राष्ट्रवादी,मनसे, संभाजी ब्रिगेड वादात आता शेतकरी कामगार पक्षाने ही उडी घेतली आहे.
शेकापचे नेते राहुल पोकळे यांनी सोशल मिडीयावर आपली रोखठोक भुमिका स्पष्टपणे मांडली आहे, बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर शिवाजी महाराज यांची बदनामी केली आहे. बदनामी कारक लेखन केले आहे.
लेम्स लेनला मदत केली आहे. पुरंदरे यांना आमचा विरोध कायम असेल, मात्र पुरंदरचे समर्थन करणारांनाही आम्ही विरोध करू. आम्ही प्रबोधनकारक केशव ठाकरे, फुले,शाहु,आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांची चळवळ चालवतो,
त्यांच्या विचारांचे प्रबोधन करीत आहे. राज ठाकरे यांनी पुरंदरे यांनी सांगितलेले शिवाजी महाराज सांगण्यापेक्षा प्रबोधन ठाकरे यांनी लिहिलेले शिवाजी महाराज सांगावेत असे आव्हान पोकळे यांनी केले आहे.
कोण खेडेकर? असे विचारणारे राज ठाकरे यांना इतिहास काय माहिती आहे? पुरूषोत्तम खेडेकर आणि प्रविण गायकवाड हे पुरोगामी चळवळीचे प्रेरणास्थान आहेत. पुरूषोत्तम खेडेकर यांच्यामुळे राज्यातील जातीय दंगली, धार्मिक दंगली थांबल्या आहेत.
सनातनांनी ज्यांच्या हातात दंगली करण्यासाठी दगडे दिली. त्याच हातात खेडेकर यांनी प्रबोधनकार ठाकरे, फुले,शाहु, आंबेडकर यांच्या विचारांची पुस्तके दिली. त्यातूनच मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला आहे.
आम्ही प्रबोधकारक ठाकरे यांच्या विचारावर पुरोगामी चळवळ पुढे नेत आहोत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड मुळे राज्यात प्रबोधन झाले आहे. अनेक तरूण पुस्तके वाचत आहेत. तुम्हाला जे जमले नाही ना, ते खेडेकर यांनी केले आहे. हे राज ठाकरे यांनी ध्यानात घ्यावे.
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी बद्दल जे मत मांडले त्यावर राष्ट्रवादीने उत्तर का दिले नाही? राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार पदाधिकारी का गप्प आहेत? पुरोगामी चळवळीचा पक्ष सांगायचा आणि पुरोगामी चळवळीला वापरून घ्यायचे आणि फायदा झाला की सोडून द्यायचे ही राष्ट्रवादीची आतापर्यंत भुमिका राहिली आहे.
राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी ही पुरंदरे यांचे समर्थन केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने याचे चिंतन करावे, असे मत पोकळे यांनी मांडले आहे. पुण्यातील मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी प्रविण गायकवाड यांना पुण्यात फिरू देणार नाही अशी भाषा वापरली आहे. त्या मोरेनी राज ठाकरे यांना खुष करण्यासाठी स्टंट करू नये.
प्रविण गायकवाड पुण्यातच काय तर राज्यात कुठेही फिरतील. हिम्मत असेल तर रोखून दाखव, असे आव्हान ही पोकळे यांनी दिले आहे. पुणे हे राजमाता जिजाऊंचे आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे आहे. पुणे हे केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर आणि प्रबोधनकारक ठाकरे या पुरोगामी विचारांच्या चळीवळीचे केंद्र आहे.
पुणे कोणाच्या बापाचे नाही, आमच्यावर हल्ला करताल तेंव्हा आम्ही 5 नसून 105 आहोत. आमच्या नादाला लागू नका, चळवळीत आम्ही जरी वेगळे असलो तरी आम्ही एक आहोत. पुण्यातच काय महाराष्ट्रात कुठेही फिरू हिम्म्त असेल तर रोखून दाखवा, आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही तयार आहोत. आम्ही पुरूषोत्तम खेडेकर आणि प्रविण गायकवाड, श्रीमंत कोकाटे यांच्या पाठिशी आहोत.