स्वातंत्र्य दिनी पंजाब मध्ये पार पडली सरदार केसरी कुस्ती स्पर्धा..
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड ः दौंड – हवेली तालुक्यातील शिवेवर असलेल्या टिळेकरवाडी गावातील बागडे – लोणकर वस्तीतील मल्ल महेश ज्ञानदेव बागडे याने पंजाब-हरियाणा राज्यात प्रसिद्ध असलेला सरदार केसरी आखाड्यात 15 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या कुस्तीत पंजाबचा मल्ल बागु गुजर याला चितपट करीत सरदार केसरी गदाचा मानकरी ठरला.
सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील मल्ल महेश बागडे यांनी सरदार केसरी गदा पटकावल्याने दौंड – हवेली तालुक्यातून त्याचे कौतुक केले जात आहे. पंजाब – हरियाणा राज्यात ही कुस्ती स्पर्धा प्रसिध्द आहे.
या सरदार केसरी मानाची कुस्ती स्पर्धा 15 ऑगस्ट रोजी अमृतसर जिल्हयातील तरणतारण तालुक्यातील मोचक गावात पार पडली. या स्पर्धेतील अंतिम कुस्ती दौंड – हवेली तालुक्यातील म्हणजेच पुण्यातील मल्ल महेश बागडे आणि पंजाबचे मल्ल बागु गुजर यांच्यात झाली.
अंत्यत रोमांचक झालेल्या या कुस्तीत मल्ल महेश बागडे याने बागु गुजर याला चितपट करून मानाची सरदार केसरीची गदा पटकविण्याचा मान मिळवला. तरनतारण तालुक्याचे आमदार धरमवीर अग्निहोत्री यांच्या हस्ते मानाचा सरदार केसरी गदा आणि रोख रक्कम 31 हजार रुपये देवून मल्ल महेश बागडे याचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गुरू अर्जून देव आखाड्यातील वस्ताद गुरू भानापट्टी, जस्सापट्टी, शिदापट्टी ,मल्ल आणि कुस्ती शौकीन उपस्थित होते. सरदार केसरी विजेता मल्ल महेश बागडे हा एक सामान्य शेतकरी कुटूंबातील आहे.
वडील ज्ञानदेव ऊर्फ दादासाहेब बागडे यांना कुस्ती क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलगा कुस्तीत मोठा पैलवान व्हावा अशी इच्छा होती. वडीलांनी लहान पणापासून महेशला कुस्तीचे धडे दिले आहेत.
वडीलांची ही इच्छा आणि स्वप्न महेश याने पंजाब राज्यातील सरदार केसरी ही मानाची गदा जिंकून पुर्ण केली. पुण्यातील नामांकित तालमीत काही दिवस महेशने कुस्तीचे धडे घेतले. नंतर त्याने कुस्तीचे माहेरघर असलेल्या पंजाब राज्यातील गुरू अर्जून देव आखाडा येथे पाठविले.
या आखाडयात वस्ताद गुरू भानापट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महेश याने दोन वर्ष सराव केला होता. मल्ल महेश याचे वडील दादा बागडे म्हणाले की, मला कुस्तीची आवड होती, परंतु गरिबी परिस्थीमुळे मला पैलवान होता आले नाही.
परंतु मी ड्रायव्हरचा व्यवसाय करून मुलगा महेशला मोठा पैलवान बनवण्याचे ठरवले. महाराष्ट्र केसरी, भारत केसरी, हिंद केसरी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असून हे माझे स्वप्न आहे.
दरम्यान पंजाब राज्यातील मानाची गदा सरदार केसरी विजेता झाल्याने दौंड आणि हवेली तालुक्यातून महेश याच्यावर आभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.