सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर :
मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा!! तिथल्या रानोमाळ बहरतील चैतन्याच्या बागा!! इथले रानोमाळ सघन घन, पसरत हिरवी द्वाही!! झुलत झुलत मस्तीत बुडालो गाणे आणिक मीही!! आदम्य विश्वासातून उभवू पाषाणातून पाणी!! महाराष्ट्राच्या शेतीवरती नक्षत्रांची लेणी!!
कविवर्य ना धो महानोर यांनी लिहिलेली ही कविता काही अशीच आणि उगाच लिहिली नाही…. जी बापमाणसं वयाच्या 75 नंतरही समाजाच्या हितासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी कष्ट असतात; अशांना अभिप्रेत केलेली ही कविता आहे…
खरात यांच्या शेतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. अथवा महान्यूज लाईव्ह युट्यूब अथवा फेसबुक वर पाहू शकता.
ती कविता आता आठवायचं कारण, म्हणजे इंदापूर तालुक्यातील सणसर येथील 76 वर्षाच्या निवृत्त मुख्याध्यापकाने चक्क आपल्या शेतात सफरचंदाची बाग रुजवली आहे…! ‘जे जे आम्हा ठावे, ते इतरांसी सांगावे’ या उक्तीप्रमाणे सातत्याने प्रयोगात रमलेल्या या अत्यंत कठोर शिस्तप्रिय माजी मुख्याध्यापकाने वेगवेगळे प्रयोग करत आपली शेती देखील प्रयोगशील बनवली आहे.
फक्त सफरचंदच नाही, तर मिरी, दालचिनी, वेलदोडा पासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या भाजपाल्यापर्यंतचे त्यांचे हे प्रयोग नव्या पिढीला प्रेरणा देतात.. प्रभाकर खरात हे ते माजी मुख्याध्यापक आहेत.
सणसर येथील जिल्हा परिषद शाळेतून ते निवृत्त झाले आणि त्यांनी आपले मन शेतीत रमवले. ज्या ओढ्याला दरवर्षी पूर येतो, काही भागातील शेती वाहून जाते.. अशा ओढ्याकाठच्या भागात तीन एकर उसाच्या शेतीतून एकरी 80 टनांपर्यंत उसाचे उत्पादन घेणार्या या अवलिया शेतकऱ्याने वयाच्या पंच्याहत्तरीनंतर आपल्या शेतात 10 गुंठ्यांमध्ये सफरचंदाची झाडे लावली आहेत.
या सफरचंदाची झाडे लावण्याची त्यांची कहाणी देखील अशीच गमतीदार आहे. त्यांचे थोरले चिरंजीव देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात नोकरी करतात. फिरण्याच्या निमित्ताने त्यांनी दार्जिलिंग भागातील सफरचंदाच्या झाडांची माहिती घेतली.
समशीतोष्ण कटिबंधात देखील ही झाडे येऊ शकतात अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्या जातीचे खुंट विकत घेतले आणि ते सणसर येथे पाठवून दिले. वडील प्रभाकर खरात यांना सफरचंद कशी लावतात आणि सफरचंदाची शेती कशी हे सुरुवातीला माहीत नव्हते, मात्र सातत्याने शोधाच्या प्रतीक्षेत राहिलेल्या प्रभाकर खरात यांनी त्याची माहिती संबंधित तज्ञाकडून वारंवार विचारून माहिती करून घेतली.
आणि त्याचे खुंट लावले. त्यासाठी लागणारी आवश्यक अशी खतांची मात्रा दिली. वातावरणाचा अंदाज घेत त्यांनी नुकताच पहिला बहार घेतला पहिला. मुळात अनेक ठिकाणी सफरचंदाची झाडे लावल्यानंतर त्याला येणारा फुटवा आणि त्याची उंची समशीतोष्ण भागात थोड्या विलंबाने होत असते.
मात्र खरात यांच्याकडील ही झाडे आत्ताच पंधरा पंधरा फूट उंचीपर्यंत पोहोचली आहेत. बहार घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला चाचणी म्हणून आपल्या बागेत आलेली सफरचंद ही व्यावसायिक दृष्ट्या बाजारात विकल्या जाणाऱ्या सफरचंद सारखीच आहेत का? याची देखील खात्री करून.
त्याच बरोबर अनेक मित्रांना बोलावून त्याचा आस्वाद इतर सफरचंदाप्रमाणेच आहे का हे जाणून घेतले. खरात यांची ही सफरचंदाची बाग पाहण्यासाठी सध्या शेतकरी दूरवरुन येतात. खरात यांनी त्यांच्या घराशेजारील पाहून एकर शेतीत असे वेगळे प्रयोग केले आहेत.
त्यांच्याकडे आक्रोड, पिस्ता, बदाम, वेगवेगळे पेरू, काश्मीरी जांभूळ, मिरी, वेलदोडा, दालचिनी, वर्षातून तीन वेळा येणारा आंबा, वर्षभर राहणारे बोर, पपई, सिताफळ, एवढेच काय, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने देणारी वांगी, मिरच्या पासून त्यांच्याकडे गोड चिंचेपर्यंत वेगवेगळी झाडे आहेत.