बारामती : महान्यूज लाईव्ह
पुरंदर तालुक्यात राज्यातला पहिला झिका रुग्ण आढळल्यानंतर जसा आरोग्य विभाग हादरला आहे, तशाच उपाययोजना ग्रामपंचायतींनीही युध्दपातळीवर करण्यास सुरवात केली आहे. बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावात डेगीचे लक्षण दिसताच सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी गांभिर्याने लक्ष घालत गावात आरोग्य खात्यामार्फत सर्वेक्षण करून घेतले.
बाबुर्डीत दोन दिवसांपासून डेंगी, चिकनगुनीयाची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी सहकाऱ्यांसमवेत मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांना याची माहिती दिली. त्यानंतर आरोग्य विभागानेही युध्दपातळीवर हालचाली करीत बाबुर्डी गावात १५ कर्मचाऱ्यांची पथके तयार करून संपूर्ण गावाचा सर्व्हे करण्यात आला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे, सरपंच पोमणे व गावातील पदाधिकाऱ्यांनी स्वतः घरोघरी जाऊन सर्व नागरिकांना खबरदारी कशी घ्यावी ही माहिती पटवून दिली.