सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाळू माफियांवर कारवाईचा धडाका चालु केला असतानाच इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार चांगदेव गोडसे यांची काल बदली झाली असून, त्यांची नियुक्ती आता सोलापूर ग्रामीणला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
वाळू माफियांवर केलेल्या कारवाईचा राजकीय हस्तक्षेपाचा बळी ठरला जाऊन बदली झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. गोडसे यांनी जानेवारी 2021 मध्ये इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी त्यांच्याकडे बारामती विभागाच्या वाहतूक शाखेचा पदभार होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी उजनी जलाशयांमध्ये बेकायदेशीरपणे उघडपणे चाललेल्या वाळू उपशावर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. वाळू माफिया यांनी उजनीतून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा चालू केला होता.
यावेळी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांनी उडवलेल्या जवळपास 19 बोटी तालुक्यात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. तर ही कारवाई वाळू माफियांच्या जिव्हारी लागली होती. आता या कारवायांमुळे त्यांची बदली होणार असल्याची चर्चा शहरात काही दिवसांपासून सुरू होती.
इंदापूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच इंदापूरच्या पवार टोळीवर शहराच्या इतिहासात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई झाल्याची ही पहिलीच घटना होती.
उजनी पाणी प्रश्नावरुन इंदापूर तहसील कचेरीसमोर जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनात त्यांनी चाप लावला होता. तर त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे फोटो वापरून कोणी अज्ञात त्यांच्या नावाचे फेक फेसबुक अकाऊंट बनवून पैशांची मागणी करत असल्याची बाब त्यांनी स्वतः व्हाट्सएपच्या माध्यमातून दिली होती.
दरम्यान, गोडसे हे एक चांगले अधिकारी म्हणून तालुक्यात नियुक्त झाले होते. इंदापूर पोलीस ठाण्याच्या ६ महिन्यांच्या त्यांच्या अल्पशा कार्यकाळात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत पाटील यांनी कालच (१५ ऑगस्ट) इंदापूर तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला असून, इंदापूरच्या पोलीस ठाण्यासाठी असाच प्रामाणिक आणि कार्यक्षम पोलीस अधिकारी मिळावा अशी अपेक्षा इंदापूर करांची आहे.
भ्रष्ट अधिकारी आल्यास व्यवसायिकांना व वाळू माफियांना बळकटी मिळेल अशी शंका व्यक्त केली जात आहे. परंतु येणारा पोलीस अधिकारी लक्ष्मी पुरस्कृत नसावा अशीच भावना इंदापूरकरांची असेल.